Thursday, December 26, 2024
Homeताज्या घडामोडीआज ९ ऑगस्टचं ‘धर्मवीर-२’ चे प्रदर्शन आता चक्क २७ सप्टेंबरला !अनेकांच्या भुवया...

आज ९ ऑगस्टचं ‘धर्मवीर-२’ चे प्रदर्शन आता चक्क २७ सप्टेंबरला !अनेकांच्या भुवया उंचावल्या

अकोला दिव्य ऑनलाईन : धर्मवीर’ चित्रपटाच्या श्रृखंलेतील ‘धर्मवीर-२’ चे प्रदर्शन राज्यभर कोसळत असलेल्या पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आल्याचे नुकतेच या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी जाहीर केले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाला शिवसैनिकांनी दोन वर्षांपूर्वी भरभरून प्रतिसाद दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ऐतिहासिक बंडापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मोठ्या राजकीय घडामोडींची पायाभरणी करणारा ठरल्याने ‘धर्मवीर-२’च्या निमित्ताने होणारी वातावरणनिर्मितीही सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

असे असताना आज शुक्रवार ९ ॲागस्ट रोजी राज्यभर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख थेट २७ सप्टेंबर अशी ठरविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुका आणि ‘धर्मवीर-२’चे लांबलेले प्रदर्शन याचा एकमेकांशी संबंध आहे का, अशी चर्चाही यानिमीत्ताने सुरू झाली आहे.

ठाणे जिल्हा आणि शिवसेना हे अनेक दशकांचे वेगळे राजकीय समीकरण राहिले आहे. एकनाथ शिंदे यांना खऱ्या अर्थाने ठाणे जिल्हा ‘दाखविला’ तो आनंद दिघे यांनी. दिघे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना शिंदे यांच्यावर ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमधील राजकीय मोहिमा सोपविल्या जात. त्यातूनच शिवसेनेचे संघटन आणि त्यातील खाचखळगे शिंदे यांच्या अंगवळणी पडत गेले. पुढे शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख झाले आणि नंतर आमदार, मंत्री. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा पाया हा नेहमीच आनंद दिघे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील ऐतिहासिक बंडापूर्वी ‘धर्मवीर’ प्रदर्शित होणे हा काही योगायोग मानला जात नाही. शिंदे यांच्या राजकीय व्यूहरचनेचा तो एक भाग मानला जातो.

‘धर्मवीर-२’चे प्रदर्शन लांबणीवर का?

‘धर्मवीर-२’चे प्रदर्शन कधी करायचे यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात खूप आधीपासून वेगवेगळ्या पद्धतीची आखणी केली जात असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल अशी चर्चा होती. मात्र लोकसभेऐवजी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित केला जावा असे शिंदे यांच्या गोटात ठरले आणि लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीतही या चित्रपटाच्या निर्मितीवर काम सुरूच राहिले. लोकसभा निवडणुकाीचे निकाल जाहीर होताच ‘धर्मवीर-२’च्या प्रदर्शनाची लगबग मुख्यमंत्र्यांच्या गोटात सुरू झाल्याचे दिसले. त्यानुसार या चित्रपटाचा टिझर, प्रदर्शनाची मांडणी मोठ्या झगमगाटात करण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे चित्रपट तारे यासाठी बोलविण्यात आले. याच दरम्यान राज्यभर मोठा पाऊस झाला आणि चित्रपट ९ ऑगस्ट ही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस कमी होताच चित्रपट प्रदर्शित होईल असेही ठरले.

असे असताना आता चित्रपट प्रदर्शनाची तारीख थेट २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास सव्वा महिना हे प्रदर्शन का पुढे ढकलण्यात आले याविषयी आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!