गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : ऑलिम्पिक स्पर्धेत ‘रेसलिंग’ खेळाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू झाली. गेल्या वर्षी मॅटपासून बराच काळ दूर राहून देखील दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदाच रेसलिंगमध्ये भारताला स्वर्ण किंवा रजत यापैकी एक पदक तर मिळणारच परंतु ती निश्चितच स्वर्ण पदकही मिळवून देईलच.अशी उमेद ठेऊ या ! ‘ती’ आज चवताळलेली वाघिण असून, ती दुसरी कोणी नसून, व्यवस्थेकडून अपमानास्पद वागणूक मिळालेली विनेश फोगाट आहे.
राजकारणातील बाहुबली (गावरान भाषेत ‘ गावगुंड’) व कुस्ती परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषणसिंहवर फोगाटसह अन्य महिला खेळाडूंनी यौन शोषणाचे आरोप केल्यानंतर काहींनी महिला खेळाडूंनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. महिला खेळाडूंना ट्रायल द्यायची नाही म्हणून खोटे आरोप करीत आहे. असाही आरोप केला. खेळाडूंच्या जातीचाही उध्दार केला होता. भाडोत्री ट्रोल गॅगने खेळाडूंना प्रचंड ट्रोल केले होते. लोकशाहीची जननी म्हटल्या जाणाऱ्या आपल्याच देशात लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. तेव्हा या व्यवस्थेने मात्र लाथा घालून, तिला फरफटत नेले.
महिला खेळाडूंचा समर्थकांचा आवाज दाबण्यात आला. मिडिया तर बटुक आहेच ना. शेवटी असहाय अवस्थेत तिने पदक परत केले. तेव्हा सत्ता व बृजभुषणचे पाय चाटणा-यांनी बक्षिसीत मिळालेले पैसे परत मागितले. हे कमी की काय रेसलरच्या प्रशिक्षणासाठी खर्ची केलेले पैसेही भरुन दे, इतपत तोंडसुख घेतले. कुस्ती परिषदेच्या अध्यक्षावर आरोप करणाऱ्या महिला खेळाडूंवर उलट इतके खोटे आरोप कशाला ? तर आरोपी हा भाजपाचा खासदार आहे. या एकमेव कारणास्तव. इतर दुसरा असता तर……किती ही आपली अधोगती?
अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून विनेशने दैदिप्यमान यश प्राप्त करून भारताचे नांव उंच केले आहे.आज त्याच फोगाटने पॅरीस ऑलिम्पिक मधील ‘रेसलिंग’ स्पर्धेत चक्क ५-० असा विजय मिळवित, अंतिम फेरी गाठली. ‘रेसलिंग’ हेच तिचा जीव की प्राण आहे. देशासाठीच ‘खेळणे’ हेच लक्ष्य असल्याने अंतिम फेरी गाठली. आज ती एकटी सर्वांना पुरुन उरली. मनाने पुर्णपणे खचून जाऊन मॅटपासून बराच काळ दूर राहिली.पण वेळ येताच आपल्या खेळाने ‘ना भुते, ना भविष्य’ यश मिळवित, नवीन रेसलर्सना प्रेरणा आणि खोटे आरोप करणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून दिली. सत्तेचा खेळ खेळणा-यांना अखेर विनेश हिने आपल्या खेळानेच जायबंदी केले. खरोखरच विनेश तुला सलाम अन् त्याचवेळी तुला एकटे पाडून, सत्तेसाठीच बाहुबली बृजभुषणला पाठीशी घालत, त्याच्या मुलाला पाठिंबा देणा-यांचा त्रिवार धिक्कार, धिक्कार !
विनेशने फोगाटने ऑलिम्पिक वगळता प्रत्येक मोठ्या खेळात पदके मिळवली आहेत. यामध्ये कॉमनवेल्थ गेम्स मध्ये एक सुवर्ण, एक आशियाई स्पर्धेतील विजेतेपद, वर्ल्ड चॅम्पियनशिप मधील दोन कांस्यांसह आशियाई चॅम्पियनशिप मधील आठ पदकांचा समावेश आहे. मात्र, तिला रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही. परंतु यंदा पॅरीस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पदक जिंकून ही उणीव फोगाट भरून काढेल. यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही.
खरंच विनेश फोगाट ही भारताची वाघीण आहे. जिने एकाच दिवसात सलग दोन सामने जिंकले. एवढेच नव्हे तर चार वेळा विश्वविजेत्या आणि सध्याच्या ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत माजी जगज्जेत्या कुस्तीपटूचा (कांस्यपदक) पराभव केला. या सामन्यात पहिल्या फेरीत विनेश फोगाटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझला एकही संधी दिली नाही. क्युबाच्या लोपेझने विनेश फोगाटच्या पायांवर सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु फोगाटच्या चांगल्या बचावामुळे तिला गुण मिळवता आला नाही. यानंतर विनेश फोगटने सलग दोन गुण घेत तब्बल ५-० अशी भक्कम आघाडी घेत एकतर्फी विजय मिळवला.
याच विनेशला आपल्या देशात लाथेने चिरडण्यात आले होते. याच मुलीला तिच्या देशात रस्त्यावरून सरपटत नेले होते. परंतु इतक्या अडचणींचा सामना करूनही विनेश फोगटची नजर ध्येयाकडेच लागून होती. आता हे सुवर्णपदक भारतात यावे हीच प्रार्थना आहे. पण एक सांगू इच्छितो की, या देशातील व्यवस्थेविरूद्ध ती हरली. पण ही मुलगी जग जिंकणार आहे. जिंकणार आहे.