अकोला दिव्य ऑनलाईन : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या अखत्यारीत असलेला आणि अकोला जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील उद्योजक, व्यापारी व प्रवाशांसाठी अत्यंत गरजेचा व महत्वाचा असलेला अकोला ते खंडवा रेल्वे मार्ग आणि अकोला स्टेशनचा उत्तरेकडील दक्षिण मध्य रेल्वेचे कार्यक्षेत्राचा भाग सेंट्रल रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचा हालचालींना वेग आला आहे.दक्षिण मध्य रेल्वेचा संपूर्ण नांदेड विभाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असताना, सध्या २०३ किलोमीटरचा अकोला खंडवा रेल्वे मार्ग व अकोला स्टेशनमधील दक्षिण मध्य रेल्वेचा उत्तरेकडील भाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. दक्षिण मध्य रेल्वे व सेंट्रल रेल्वे महाप्रबंधकांमध्ये या मुद्द्यावर एकमताने सहमती झाली आहे.
दक्षिण मध्य रेल्वे झोनल महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी नवी दिल्ली येथील रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत पत्र लिहून, दक्षिण मध्य रेल्वे ल मध्य रेल्वेच्या दोन्ही महाप्रबंधकांमध्ये झालेल्या पत्र व्यवहारांचा तपशील दिला आहे.तसेच दोन्ही झोनमध्ये अकोला खंडवा रेल्वे मार्ग व अकोला स्टेशनचा उत्तरेकडील भाग सेंट्रल रेल्वेकडे हस्तांतरित करण्याबाबत आधीच सहमती झालेली असल्याचे कळविले आहे. यासोबतच हा मार्ग मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचे फायदे सुद्धा नमुद केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीच प्रस्ताव मंजुरी करिता रेल्वे बोर्ड दिल्लीकडे पाठविण्यात आला आहे. तेव्हा लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी.अशी मागणी वजा विनंती थेट दक्षिण मध्य रेल्वेचा महाप्रबंधकांनी केली असल्याने लवकरच ही मागणी पूर्ण होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
अकोला-खंडवा या रेल्वे मार्गाचे डिव्हीजन नांदेड असले तरी झोनचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे.त्यामुळे या झोनमधील मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील प्रवाशांवर सातत्याने अन्याय होत आहे. मात्र आता हा मार्ग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित झाल्यावर मध्य रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई येथे आहे. तसेच हा मार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अकोला खंडवा मार्गाच्या गेज परिवर्तनासह विद्युतीकरण, दुहेरीकरण या सारख्या कामांना गती मिळून पश्चिम विदर्भातील रेल्वेचे जाळे वाढण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत.