गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : सर्व सुख पायाशी लोळण घेणाऱ्या कुटूंबातील पाल्य, यासोबतच सोयीसुविधांच्या अभावग्रस्त परिवारातील मुलं/मुलींची अवस्था खरोखरच बिकट होत चालली आहे. दोन्ही वर्गातील निरागस मुलं-मुली मनसोक्त नैसर्गिक आनंद व उत्साहापासून पूर्णपणे वंचित आहेत. लहान वयातच मोठा (?) माणूस बनण्याचे दडपण, वजनदार अभ्यासक्रमाचे ओझे, यामुळे भविष्यातील व्यवहारी जीवनात येणाऱ्या दडपणाला झुगारून सुसंस्कृत,समाधानी जीवन जगण्यासाठी; नैसर्गिकरित्या सुदृढ शरीर व कणखर वैचारिक बैठकीपासुन ही मुलं/मुली वंचित होत आहेत.हे कटू सत्य आहे. झेपावत नसलेल्या ताणतणावाने लहान वयातच मुलांमध्ये मानसिक आजार वाढत आहे. अनेक मुलं/मुली यामुळे सहजरित्या गुन्हेगारीकडे वळत असून, अनेकजण उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी मृत्यूला का कवटाळत आहे ?
दोन्ही वर्गातील मुलांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे ना !मध्यमवर्गीय कुटुंबातील पाल्यांवर स्वतः सोबत कुटुंबाच्या प्रगतीचे दडपण तर सधन कुटुंबातील मुलांना स्वतःसह पालकांच्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करण्यासाठी द्यावी लागणारी झुंज, एकसारखीच आहे.आज घरोघरी उच्च शिक्षण आवश्यक असल्याचे लहानपणापासून मुलांच्या मनात ठासून ठासून भरविल्या जात आहे. आपल्या मुलाच्या शारीरिक व बौद्धिक क्षमता लक्षात न घेता लादल्या जाणाऱ्या अपेक्षांचा ओझ्याने मुलांच्या भावविश्वाला पुर्णपणे बदलून टाकले आहे.
लहानपणातच जीवन जगणे त्यांना एक मोठे आव्हान वाटू लागतं. या आव्हानासाठी स्वतःला सक्षम करण्याच्या प्रयत्नात मुले सैरभैर होत आहेत. शिक्षण हे जीवन जगण्याचे एक माध्यम आहे किंवा होऊ शकते.पण जीवनाचे सर्वस्व: नाही. एवढा प्रचंड ताणतणाव या चिमुरड्यांवर का येत आहे. स्वतःच्या पाल्यावरचं मानसिक दडपण समजण्यात पालक कोठे तरी कमी पडत आहे ? की स्वतःच्या आशा, आकांक्षा, अपूर्ण इच्छा व अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करून घेण्याच्या लालसेपोटी तर अप्रत्यक्षरित्या आपल्या मुलांवर दडपण आणत नाही ना ! हा खरा सवाल असून याची सर्वांना गंभीरपणे दखल घेतली नाही. तर भावी पिढीच जीवन अंधकारमय होईल.ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असून, शिक्षणाचं पावित्र्य पार लयास गेले आहे. फक्त बाजार बसव्यांचा धंदा व शासकीय अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. शिक्षणक्षेत्राची अवस्था दिवसागणिक बिकट होत चालली आहे.भावी पिढीच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
आज सर्वच क्षेत्रात निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, बदलती जीवनशैलीने केवळ टिकून राहणे नव्हे.तर पुढे व सतत पुढे राहण्याचा दृष्टीकोन, प्रचंड किर्ती, अमाप पैसा आणि सत्तास्थानी किंवा सत्तेच्या मागे धावण्याची शर्यतीत सहजरित्या मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. मुलांना जे हवं असतं ते सोडून, आपण सगळं देत असतो. स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेणार की, मी माझ्या मुलाला काही कमी पडू दिले नाही. भौतिक सोयीसुविधा देण्याकडे कल वाढत आहे.पण मुलांवर वाढत जाणारा मानसिक ताणतणाव लक्षात कसा घेत नाही. घरात आजीआजोबा नसल्याने मुले सैरभैर होतात, हे किती लोकांना कळतं !
एकीकडे व्यापारी, उद्योजक आणि अधिकाऱ्यांची मुलं म्हणून असणाऱ्या ओळखीमुळे त्या मुलांना दुर्दैवाने हा स्पेस बाहेरच्या समाजातही सहजासहजी मिळत नाही. दुसरीकडे मध्यमवर्गीय व गरीब घरातील मुलं म्हणून समाजात सहजपणे वावरता येत नाही. मुलांचही एक वेगळं विश्व आहे. हे विसरून चालणार नाही.आपल्या दृष्टीने जरी क्षुल्लक असल्यातरी त्याचं ऐकून घेवून, त्यांच्यात नवी उमेद, नवा विश्वास निर्माण करणं गरजेचं असतं तेव्हा, त्यावेळी आपण काय करतो ? पालकांचा अतिरिक्त हस्तक्षेपही सुरू राहतो. सातत्याने मुलांच्या विचारांवर होणाऱ्या कुठारघातमुळे, काही घरात अभ्यास आणि पालक तर काही घरांमध्ये गरीबी आणि नाईलाज या दोन्हीला घेऊन अढी निर्माण होतात.
आपण खूप चांगले पालक झालो, असा गोड गैरसमज पालकांमध्ये निर्माण होत आहे. गरिबीत जन्माला येणे आपल्या हातात नाही, मात्र गरिबीत मरणे, आपल्या अपयशाचे फळ आहे.ही बाब पाल्यांच्या मनात बिंबविण्यात मध्यमवर्गीय आईवडिल कमजोर पडतात. संयम आणि सतत परिश्रमाने परिस्थितीवर मात करून कसे पुढे जावे, यासाठी वळण लावत नाही. एकीकडे वेळ नाही, दुसरीकडे इत्यंभूत माहितीचा अभाव. मुलांच्या भावना, विचार समजून घेण्याऐवढं समजूतदारपणा व सांगण्याऐवढी माहिती व सामंजस्याची भूमिका नसेल, तर कौटुंबिक समन्वय राहत नाही आणि पाल्याची वाट कोठे तरी चुकते. परिपक्वता एक निरंतर प्रक्रिया असून आईवडील या प्रक्रियेचे केंद्रबिंदू आहे.
युवापिढीच्या चुकीच्या कल्पना व संकल्पना दूर करण्यासाठी आईवडिलांना स्वतःहून पुढाकार घ्यावा लागतो. प्रत्येकवेळी आदेश, प्रत्येकवेळी चौकशीच किंवा प्रत्येकवेळी मागणी केली की, ती पूर्ण करण्याची भूमिका घेणे कधीही नको.पाल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील आवश्यक आहे.पाल्यासोबत त्याच्या अडचणीवर उपाय शोधणे देखील गरजेचे आहे.मुला-मुलींना विश्वासात घेत, समजून सांगणे आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने असा विश्वास निर्माण करण्यात आईवडिलांना अपयश येत असून, पाल्य वेगळा निर्णय घेऊ लागले किंवा वेगळ्या वाटेने पुढे जाऊ लागले आहे. तेव्हा पालकांनो वेळीच सजग व्हा, सावध रहा