अकोला दिव्य ऑनलाईन : मृतकाच्या नावाने 2011 मध्ये बँकेत खाते उघडून, त्या खात्यात कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केल्या प्रकरणी अकोल्यातील दारू व्यावसायिक राजेंद्र उर्फ राजु जयस्वाल आणि त्याचा मुलगा शांकी जयस्वाल यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकारणातील थोडक्यात हकीकत अशी आहे की, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवाशी पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांच्या नावावर अकोला शहरात देशी विदेशी दारू विक्रीचा परवाना आहे. यामधे राजु उर्फ राजेंद्र जयस्वाल याला १९८७ साली व्यवस्थापकीय भागीदार म्हणून घेण्यात आले होते. त्यानंतर मूळ परवानाधारक पुरुषोत्तम गावंडे यांचे 12 फेब्रुवारी 2000 साली निधन झाले. मात्र राजु जयस्वाल याने पुरुषोत्तम गावंडे यांना जिवंत दाखवून अकोला येथील एका मल्टीस्टेट शेड्युल बँकेच्या अकोला शहरातील मुख्य शाखेत खाते उघडले.
बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने मृतक गावंडे यांच्या नावाने खोटी केवायसी करून बनावट बँक खात्यात व्यवहार केला.नोटबंदीच्या काळात तब्बल 27 कोटी रुपयांचा नगदी भरणा करून मृत्यू पावलेल्या वडिलांची व कुटुंबाची फसवणूक केली. असा आरोप करून तक्रार दारू विक्रेत्यांवर गुन्हे नोंदवून फौजदारी कारवाई करावी, अशी तक्रार मृतकाचे पुत्र अमित पुरुषोत्तम गावंडे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीची दखल घेत सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात भादविच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे
काही दिवसांपूर्वी अमित पुरुषोत्तम गावंडे यांनी अकोल्यात वार्ताहर बैठक घेऊन त्यांच्या कुटुंबाच्या झालेल्या फसवणूकीची माहिती दिली होती.आपले वडील स्व. पुरुषोत्तम गावंडे यांच्या नावाने गांधी चौक येथे देशी विदेशी दारू विक्रीचे विदर्भ वाईन शॉप असून दारू विक्रीची अनुज्ञप्ती असलेल्या आपल्या वडिलांनी राजु उर्फ राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल याला सदर दुकान चालवण्यासाठी सन 1987 साली भागीदार म्हणून घेतले होते.
भागीदारी पत्राप्रमाणे व्यवस्थापक म्हणून राजेंद्र जयस्वाल हाच दुकानाचा संपूर्ण व्यवहार बघत होते.दि.12 फेब्रुवारी 2000 रोजी वडिलांचे निधन झाले. मात्र वडिलांच्या नावाने सुरु असलेल्या सदर अनुज्ञप्तीची किंवा त्या संबंधी कुठल्याही व्यवहाराची कुठलीही माहिती नव्हती. परंतु अचानक 10.05.2021 रोजी बॅंकेचे पत्र मिळाले. ज्यात विदर्भ वाईन शॉप, गांधी चौक अकोला या नावाने त्यांच्या बँकेत (खाते क्र.10010220 00468) खाते सुरु असून स्व. पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांचे केवायसी कागदपत्रे जमा करणे अनिवार्य असल्याचे नमूद केलेले होते. सुमारे २२ वर्षांपूर्वी वडिलांचं निधन झाले असून सुद्धा त्यांच्या नावावर बॅक खाते विना केवायसी सुरु कसे ?
मृतक वडिलांच्या नावे सुरु असलेल्या खात्यासंबंधी विस्तृत माहिती घेण्याकरिता दि.5 जुलै 2024 रोजी बॅंकेला विनंती पत्र दिले. सदर पत्राच्या उत्तरात त्यांनी सदर खात्याशी संबंधित सुमारे २ पानांची सर्वसाधारण माहिती पुरवली. बँकेने पुरवलेल्या माहितीने अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या. दि.12 फेब्रुवारी 2000 रोजी गावंडे यांचे निधन झाले असल्याची बाब जयस्वाल पितापुत्राला मुलाला माहित असून सुद्धा त्यांच्या नावे हे संयुक्त खाते विदर्भ वाईन शॉप या नावाने उघडल्या गेले. खाते उघडताना वडिलांनी फॉर्म 60 जमा केला असे त्या कागदपत्रांवर नमूद केलेले आहे. वास्तविक वडिलांचा सदर फॉर्म 60, हा त्यांच्या निधना नंतर तब्बल 11 वर्षांनी त्यांच्या बनावट सह्या करून सादर केला गेला आहे.
या खात्याची संपूर्ण केवायसी ही 28 ऑक्टोबर 2013 ला केलेली दिसून येत असून सन 2013 नंतर पुन्हाकेवायसी ही करायची कागदपत्रांमध्ये दि.28 ऑक्टोबर 2015 अशी नमूद केलेली आहे.याचा अर्थ सदर खाते हे सन 2015 पासून विना केवायसी सुरु आहे, यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या केवायसी संबंधीच्या निर्देशांचे सुद्धा स्पष्ट उल्लंघन झाले आहे. नोटबंदीच्या काळात या खात्यात रोख भरणा 27 कोटी 6 लाख 22 हजार 500 रुपये एवढा झाला असून, सरकार इन्कमटॅक्स विभागापासून लपवून ठेवलेला हा नफा किंवा काळापैसा आहे.
ही बाब शासनाला तथा इन्कमटॅक्स विभागाला कळवणे अपेक्षित असताना बँकेने ही अत्यंत गंभीर बाब शासनापासून लपवून ठेवली. असे, तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 338,336(3), 340(2),3(5), खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखली सहाय्यक पोलीस अभिषेक अंधारे करीत आहेत.