अकोला दिव्य ऑनलाईन : खोलेश्वर व परिसरातून अक्कलकोट व जुने शहर भागात जाण्यासाठी मोर्णा नदीवर तयार करण्यात आलेल्या पुलाचे राजेश्वर सेतू नामकरण करण्यात आले. मात्र या सेतूची उंची अत्यंत तोकडी (कमी) असून मोर्णा नदीपात्रात पाण्याची पातळी थोडीही वाढली तर संपूर्ण सेतू पाण्याखाली जातो. दर पावसाळ्यात हे उघड सत्य सर्वजण बघत आले आहे. विशेष म्हणजे अलिकडच्या दोन वर्षांपासून सेतूच्या दोन्ही बाजुला कठडे नाही. अशा धोकादायक ठरलेल्या या सेतूवरुन चार वर्षाचा चिमुकला आपल्या वडिलांसोबत मोटरसायकलवर जात असताना, मोटरसायकलवर स्लिप झाली आणि पाण्यात वाहून गेला. जर पुलाच्या दोन्ही बाजुला कठडे असते तर त्याचा जीव निश्चित वाचला असता.
जुन्या शहरातील तसेच हरिहर पेठ भागातील हजारो लोकांचे दररोज या पुलावरून वर्दळ असते. अशा परिस्थितीत एवढ्या महत्त्वाच्या पुलावर लोखंडी कठडे बसविण्यात आले नाही.ही खरोखरच चीड निर्माण करणारी बाब आहे. राजेश्वर सेतूवर तात्काळ कठडे बसवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी महापौर मदन भरगड यांनी दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सेतूची निर्मिती करताना, पुलाची उंची आणि पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे पाणी, याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. दोन्ही बाजुला कठडे नाही. त्यामुळे अनेक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. या पुलाची तातडीने उंची वाढविण्यात यावी, अन्यथा अशी घटना घडली तर जबाबदार कोण ? असे भरगड यांनी सांगितले.