Monday, September 16, 2024
Homeन्याय-निवाडाअटक होणार ? पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

अटक होणार ? पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

अकोला दिव्य ऑनलाईन : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात चर्चेत आलेल्या माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी दिल्लीच्या पतियाला कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांच्या अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूजा खेडकर या निकालाविरोधात पुन्हा वरच्या कोर्टात अपील करणार की नाही? याविषयी निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पूजा खेडकर यांच्यावर नेमके आरोप काय ?
पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, बेकायदेशीरपणे दिव्यांग असल्याची चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यासंदर्भात UPSC व लाल बहादूर शास्त्री अकादमीकडून तपास केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षम मिळण्यासाठी पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर दिल्लीच्या पतियाला कोर्टामध्ये सविस्तर सुनावणी पार पडली.

काय आदेश दिले न्यायालयाने ?
बुधवारी पूजा खेडकर प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पतियाला न्यायालयाने यासंदर्भातला निकाल दिला. त्यानुसार पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. “UPSC मधील आणखी कुणी पूजा खेडकर यांना या सगळ्या प्रकारात मदत केली आहे का? याचीही चौकशी दिल्ली पोलिसांनी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर, पूजा खेडकर व्यतिरिक्त इतर असे कोणते उमेदवार आहेत का ज्यांनी निकषांत बसत नसतानाही क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केला होता किंवा दिव्यंगत्वासाठीचे पात्रता निकष ओलांडले होते याचा तपास यूपीएससीनं करावा, असे आदेश यावेळी न्यायालयाने दिले. नेमकं प्रकरण काय?
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा ठपका पूजा खेडकर यांच्यावर आधी ठेवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. पुढे पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याचबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा उल्लेख न्यायालयातील सुनावणीमध्ये करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!