अकोला दिव्य ऑनलाईन : आपल्या सोयीनुसार व राजकीय फायद्यासाठी लोकांच्या भावभावनांसोबत खेळणारे नेते आणि त्यांना आपला आदर्श मानणारे युवा समर्थक आणि तरुण विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनाने अनेकदा अघटीत घडले असून अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या ताडाफोडीनंतर एका तरुणाचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना अकोल्यात घडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला.
अकोल्यातील शासकीय निवासस्थानी असताना मनसैनिकांनी बाहेर असलेली मिटकरींची गाडी फोडली. या तोडफोडीनंतर मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीत सहभागी असणार्या मनसैनिक जय मालोकर याच निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते मिटकरी यांच्या गाडीची दुपारी तोडफोड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांमध्ये मनसेचे जे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामध्ये जय मालोकर या तरुणाचाही समावेश होता. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या या गोंधळानंतर जय मालोकर याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांना जयचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं.दरम्यान, घरातील तरुण पोराचा अकाली मृत्यू झाल्याने मालोकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.