गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : १९३२ मध्ये झालेल्या सत्याग्रहात युद्धमंत्री ब्रजलालजी बियाणी यांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषोत्तम बळवंत गोळे, लक्ष्मण सिताराम मराठे, परशराम जोगळेकर, गोविंदराव कुळकर्णी, रंगनाथ केळकर, दुर्गाबाई जोशी, राधाबाई ओक, रमाबाई केळकर, ताराबाई मश्रृवाला, मनूताई कोल्हटकर, प्रमिलाताई ओक, मथूराबाई आपटे यांनी बेरारच्या गावागावांत आणि शहरामध्ये काँग्रेसचे अस्तित्व निर्माण केले. ब्रजलालजी बियाणी यांना 14 जानेवारी 1935 रोजी बेरार प्रांतीय काँग्रेस कमिटीच्या सभापतीपदाची सूत्रे सोपविण्यात आली. पहिल्याच बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला की, ‘इतःपर वऱ्हाड प्रांतीय काँग्रेस कमिटीचे मुख्यालय अकोला येथे ठेवण्यात यावे’ आणि १९३५ पासून अलिकडच्या काही काळापर्यंत अकोला शहर राजकीय आणि सामाजिक चळवळीचे प्रमुख केंद्र होते. वऱ्हाडच्या राजकारणाची सुत्रे अकोल्याच्या हातात होती. २० व्या शतकाच्या सुरुवातीलाच राजकीय चळवळीचे स्वरुप उग्र होऊ लागले.
काँग्रेसची कार्यप्रणाली आणि ध्येयात क्रांतीकारी परिवर्तन झाले. क्रांतीकारी व्यक्तीमत्व आणि संघटनांचा या दरम्यान उदय झाला. हिंसामध्ये विश्वास ठेवणारे इंग्रज अधिकाऱ्यांचा खात्मा करुन स्वराज्य मिळवुन घेण्याची आकांक्षा ठेवत होते. ठिकठिकाणी या संघटनेंकडून बॉम्ब तयार करणे, पिस्तूल आणि इतर शस्त्र मिळवून घेवून, त्या शस्त्र आणि बॉम्बद्वारे इंग्रजांच्या हत्येची योजना तयार करत होते. कधी त्यांना यश मिळत तर कधी अपयशी होवून फासावर चढत होते. अकोला व बेरारमधील तरुण क्रांतीकारांची दखल दस्तुरखुद्द इंग्लंडमध्ये घेतली जाऊ लागली. त्या काळच्या प्रख्यात बंगाल बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासासाठी बंगाल पोलिस अकोला शहरात आले होते. या प्रकरणी १७ जुलै १९०८ रोजी पोलिसांनी दत्तात्रय भिडे व त्यांचे भाऊ विठ्ठलराव भिडे यांच्या घराची झडती घेतली. मात्र आपत्तीजनक कोणतीही वस्तू सापडली नाही. एवढेच नव्हे तर त्या काळातील नाशिक येथील गाजलेल्या जक्शन हत्या प्रकरणात अकोला येथून दोघांना अटक करण्यात आली होती. सत्याग्रही संघटना आणि काँग्रेस संघटना या दोघांच्या माध्यमातून अकोला शहर मवाळ आणि उग्र या दोन दलाचे प्रमुख केंद्र बनले होते.
काँग्रेसच्या मुस्लिम संदर्भातील भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ता मामासाहेब जोगळेकर यांनी काँग्रेसचा त्याग करीत अकोल्यात हिंदु महासभेची मुहूर्तमेढ केली. वऱ्हाडात काँग्रेस दूभंगण्याची ही पहिली घटना असून १९३० नंतर जोगळेकर यांनी अत्यंत तन्मयतेने हिंदु महासभेच्या कार्याला सुरुवात केली अनेकांचे शुद्धीकरण करुन हिंदु धर्मावलंबी केले. हिंदु महासभेच्या झेंड्याखाली भारतातील अनेक गणमान्य नेत्यांना अकोल्याला आमंत्रित केले. अखिल भारतीय हिन्दू महासभेचे अध्यक्ष महामना मदन मोहन मालवीय यांनी देखील भेट दिली.
विशेष म्हणजे अकोल्यात 7 ऑगस्ट 1931 रोजी हिंदु महासभेचे १३ वे राष्ट्रीय अधिवेशन राष्ट्रीय सभापती विजयराघवाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मामासाहेब जोगळेकर यांनी हिंदु महासभेच्या कार्याला धार दिली. दरम्यान १९३६ मध्ये मुस्लिम लिग संघटनेत जान-जोश फुंकण्यात आले. अकोल्यात १९४० मध्ये हैदराबादचे नवाब बहादुर यारजंग यांच्या अध्यक्षतेत मध्यप्रांत मुस्लिम लिगची आमसभा होऊन शहरात मुस्लिम लिगचे बिजारोपण झाले.