अकोला दिव्य ऑनलाईन : खदान पोलिस स्टेशनच्या लाचखोर पोलिस कर्मचाऱ्याला काही वेळेपुर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता डुकरे एसीबीचा पाहुणचार घेत असून आज ज्या प्रकरणांत त्याला गजाआड केले त्याची हकीकत बाहेर आली आहे.
अकोला येथील खदान पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार असलेला गणेश श्रीराम डुकरे (३४) हा मुळचा बुलडाणा जिल्ह्यातील अंभोरा, येथील असून, सध्या नविन निमवाडी पोलीस वसाहतीतील बिल्डींग क्रमांक ४ A, फ्लॅट नंबर ४३ येथे वास्तव्यास आहे. तक्रारदाराने दि.१६ जुलै २०२४ रोजी अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात प्रत्यक्ष येवून तक्रार दिली की, पोलीस कर्मचारी गणेश डुकरे हा त्यांच्या दुकानावर आला व “तुम्ही चोरीची भांडी खरेदी केलेली आहेत” केले. त्यामुळे “तुमच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करावी लागेल.जर गुन्हा दाखल होवू द्यायचा नसेल व अटक टाळायची असेल तर एक लाख रुपये द्या” अशी मागणी केली. परंतु तक्रारदाराची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गणेश डुकरे विरूध्द कारवाई करण्यासाठी अकोला एसीबी कार्यालयात तक्रार दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने दि.१६ जुलै रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी कार्यवाही केली. पडताळणी कार्यवाही दरम्यान गणेश डुकरे याची पो.स्टे.खदान येथे तक्रारदार सोबत भेट होवुन बोलणी झाली असता डुकरेने तडजोडीअंती एक लाख ऐवाजी २०,००० रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर दि.१६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी सापळा कार्यवाही आयोजित केली असता, डुकरेला तक्रारदारावर संशय आल्याने डुकरेने त्यांना भेटायचे टाळले व संपर्क सुध्दा केला नाही. डुकरेला तक्रारदार वर संशय आल्याने लाचेची रक्कम घेण्यास टाळाटाळ करीत असल्याची व लाच रक्कम स्विकारणार नाहीत. याची खात्री झाल्याने, सदर तक्रारीवरून डुकरे विरूध्द पो.स्टे.खदान येथे आज गुरुवार दि.२५ जुलैला अप.नं.५७३/२०२४ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी पोलीस कर्मचारी गणेश डुकरेला जुने एस.पी.कार्यालया जवळून तात्काळ ताब्यात घेण्यात आले.