अकोला दिव्य ऑनलाईन : सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांच्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दखल घेत, येत्या मंगळवारी आयुक्तांच्या दालनात सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची लेखी हमी आज दिल्याने आंदोलन तृतास स्थगित करण्यात आले. महापालिका प्रशासनाने निलेश देव यांच्यासोबत गेल्या तीन दिवसात चार वेळा आंदोलन स्थळी बैठक घेत विविध प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शवली. आज मनपा उपायुक्त गीता ठाकरे, कर अधीक्षक विजय पारतवार, विठ्ठल देवकते व इतर अधिकार्यांनी निलेश देव यांच्याशी सायंकाळी चर्चा केली. रात्री साडेसात वाजता उपायुक्त गीता ठाकरे यांनी निलेश देव यांना जुस देत अन्नत्याग आंदोलन थांबविले.
दरम्यान, निलेश देव यांनी या विषयावर अकोलेकरांना दिलासा मिळाला नाही तर, पुन्हा ऑक्टोबर महिन्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे.स्वाती इंडस्ट्रीज लाडकी कोणाची ? असा प्रश्न करत निलेश देव यांनी कर खाजगीकरणाच्या विरोधात तीन दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते. निलेश देव यांना शुगर असल्याने त्यांची प्रकृती ढासळली होती. या अन्नत्याग आंदोलनाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता अढाऊ यांनी महापालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने यांना विचारणा केल्यावर आंदोलन स्थगित करण्यासाठी वेगाने पावले उचलण्यात आली. महापालिका आयुक्तांनी लेखी पत्र देत सर्व विषयांवर मंगळवार दि.३० जुलै रोजी आयुक्तांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे.
अकोल्यातील स्वाती इंडस्ट्रीज लाडकी कोणाची ? असा प्रश्न जनमानसात विचारला जात आहे. अन्नत्याग आंदोलनामुळे तिसर्या दिवशी निलेश देव यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी निलेश देव यांची वाढती शुगर पाहता, आंदोलन थांबविण्याचा सल्ला दिला होता. या आंदोलनास जठारपेठ भागातील मातृशक्तीने उत्स्फुर्त पाठिंबा दिला. अकोल्यातील विविध राजकीय पक्षांनी,नेत्यांनी महापालिकेच्या कर वसुली खाजगीकरणास विरोध केला होता.