अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्रामध्ये ओबीसी वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून या महिन्याच्या अखेरीस ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा.ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी हा प्रश्न तत्परतेने सोडवावा, अशी मागणी शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि वंजारी समाजाचे नेते रामेश्वर पवळ यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले.
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. वसतिगृहाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शहरात उच्च शिक्षणासाठी भाड्याने खोली घेऊन राहावे लागते.परिणामी उच्च शिक्षणाची आवड असतानाही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत २०२२च्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत मुला-मुलींसाठी प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेचे दोन वसतिगृह सुरू करण्याची घोषणा सरकारने केली होती. २०२३ मध्ये पावसाळी अधिवेशनात ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी १५ ऑगस्टपर्यंत वसतिगृह सुरू होतील, असे आश्वासन दिले.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बहुतांश जिल्ह्यांत इमारती आणि कर्मचारी नियुक्तीचा प्रश्न सुटलेला आहे. प्रवेशासाठी अर्जही मागविण्यात आले आहेत. मागील वर्षीप्रमाणे ही प्रक्रिया रेंगाळू नये, ही प्रक्रिया थांबू नये याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावे, असे पवळ यांनी निवेदनात म्हटले आहे.