अकोला दिव्य ऑनलाईन : शिवसेना नेते भावना गवळी व कृपाल तुमाने यांच्या विधानपरिषदेवरील निवडीने शिवसेनेला विदर्भात बळ मिळणार. या भागातील प्रश्नांचा आवाज विधानपरिषदेत बुलंद होणार, असा विश्वास शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त विधानपरिषद सदस्य भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचा मुंबईच्या विधानभवनातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात पवळ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी खासदार नरेश मस्के, आ. सदाभाऊ खोत, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना नेत्या मनीषा कायंदे, शिवसेनेचे सचिव आनंद जाधव, उपनेते अमित गिते, जगदीश शेट्टी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पवळ म्हणाले, भावना गवळी यांनी पाच टर्म लोकसभेत खासदार म्हणून आपली कारकीर्द गाजविली. विधानपरिषदेच्या निमित्ताने त्या राज्यात परतल्या आहेत. राज्यातील प्रश्नांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास असणाऱ्या या नेत्या आहेत. त्यांच्या माध्यमातून विदर्भासोबतच राज्यातील प्रश्न विधानपरिषदेत मांडले जातील. प्रत्येक प्रश्न तडीस नेण्याची त्यांची हातोटी पक्षाला बळ देणार, असे पवळ म्हणाले.
रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार राहिलेले कृपाल तुमाने देखील विधानपरिषदेच्या माध्यमातून राज्यात परतले आहेत. त्यांच्या पूर्व विदर्भातील प्रश्नांच्या अभ्यासाचा प्रभाव विधानपरिषदेत दिसून येणार आहे. तळागाळातील त्यांचे कार्याची आजही अधिक प्रमाणात चर्चा होते. मतदारसंघातील प्रत्येकाशी थेट संपर्क साधून असलेले हे नेते आहेत. गवळी आणि तुमाने या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून विदर्भातील दोन्ही विभागांमध्ये पक्षाला निश्चितच बळकटी मिळणार, असेही पवळ यांनी यावेळी स्पष्ट केले.