अकोला दिव्य ऑनलाईन : शहरातील दारु व्यावसायीकाने बॅक अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून आपल्या मयत वडिलांच्या नावावर बँकेत खाते चालवून नोटबंदी आणि करोना काळात तब्बल 27 कोटी रुपयांचा गैर कायदेशीर व्यवहार केला आहे. मृतक वडिल व कुटुंबाची आणि शासनाची सरळसरळ अर्थिक फसवणूक केली आहे.तेव्हा सर्व संबधितांवर या प्रकरणी तातडीने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी मृतकाचे पुत्र अमित पुरूषोत्तम गावंडे यांनी केली. अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या वार्ताहर बैठकीत अमित पुरुषोत्तम गावंडे यांनी या प्रकरणाबाबतची माहिती दिली.
या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथील स्व. पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांच्या नावाने अकोला शहरात गांधी चौक येथे विदर्भ वाईन शॉप या नावाने देशी विदेशी दारू विक्रीचा परवाना आहे. अकोला येथील रामदास पेठ रहिवासी राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वालला 1987 साली या दुकानात भागीदार घेतले होते. भागीदार करारनामानुसार या दुकानाचे व्यवस्थापक म्हणून राजेंद्र जयस्वालच संपूर्ण व्यवहार बघत होते. दरम्यान पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांचे 12 फेब्रुवारी 2000 रोजी निधन झाले. मात्र वडिलांच्या नावे सुरु असलेल्या सदर अनुज्ञप्तीची किंवा त्या संबंधी कुठल्याही व्यवहाराची माहिती आपणास किंवा कुटुंबीयांना नव्हती. असे गावंडे यांनी सांगितले.
दरम्यान 10 मे 2021 रोजी अकोला येथील एका बॅंकेचे लेखी पत्र मिळाले. ज्यात लिहिले होते की, अकोला येथील गांधी चौकात असलेल्या विदर्भ वाईन शॉप या प्रतिष्ठानाचे बॅकेत व्यवहारात सुरू असलेले खाते आहे आणि 10010220 00468 या क्रमांकाच्या खात्यासाठी पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांचे केवायसी कागदपत्रे जमा करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले. तेव्हा हे गौडबंगाल काय म्हणून सखोल चौकशी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, असे मृतक पुरूषोत्तम गावंडे यांचे पुत्र अमित गावंडे यांनी वार्ताहर बैठकीत सांगितले.
आपल्या वडिलांचे सुमारे २२ वर्षांपूर्वी निधन झाले असताना त्यांच्या नावाने विना केवायसी खाते सुरु कसे ? म्हणून सदर खात्यासंबंधी विस्तृत माहितीसाठी बॅकेच्या मुख्य शाखेला लेखी पत्र दिले. सदर पत्राच्या अनुषंगाने या खात्याशी संबंधित २ पानांची सर्वसाधारण माहिती लेखी स्वरूपात बँकेने दिली. माहितीचे अवलोकन केले असताना अत्यंत गैर कायदेशीर बाबी समोर आल्या असून दारु व्यावसायीक राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल व त्यांचा मुलगा शांकी राजेंद्र जयस्वाल व बॅकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने कट रचून मोठी फसवणूक केली असल्याचा आरोप अमित गावंडे यांनी केला.
सदर बॅकेत खाते उघडण्या आधी म्हणजे 12 फेब्रुवारी 2000 रोजी पुरुषोत्तम गावंडे यांचें निधन झाले असून राजेंद्र जयस्वाल व त्यांच्या मुलालाही ही बाब माहित आहे. तरीही विदर्भ वाईन शॉप या नावाने संयुक्त खाते उघडल्या गेले.विशेष म्हणजे खात्याचे मुख्य खातेदार मृत असतांना त्यांच्या नावाने संयुक्त खाते कसे उघडल्या गेले. खाते उघडताना बॅंकेने खातरजमा करून घेतली होती का? केली असेल तर कशा प्रकारे हे महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे या वेळी मृतक वडिलांनी फॉर्म 60 जमा केल्याचे नमूद केलेले आहे. मात्र फॉर्म 60 हा त्यांच्या निधनानंतर तब्बल 11 वर्षांनी त्यांच्या बनावट सह्या करून सादर केला गेला आहे.असा गंभीर आरोप गावंडे यांनी केला आहे.
तर या खात्याची केवायसी ही 28 ऑक्टोबर 2013 रोजी केली आहे. सन 2013 नंतर पुन्हा केवायसी दि. 28 ऑक्टोबर 2015 रोजी करण्याचे नमूद केले आहे. म्हणजे सन 2015 पासून विना केवायसी खाते सुरु आहे. दरम्यान नोटबंदी काळात या खात्यात नगदी 27,06,22,500 एवढा झाला आहे. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी घोषित केल्याप्रमाणे 2 लाखापेक्षा जास्त नगदी रकमेबाबत शासनाला कळवणे अपेक्षित असतांना कोट्यावधी रुपयांच्या रक्कमेची माहिती लपवून का ठेवली ? ही अत्यंत गंभीर बाब केवळ राजु जयस्वाल व शांकी राजेंद्र जयस्वाल यांना मदत करण्यासाठी शासनापासून लपवून ठेवली असल्याचा आरोप अमित गावंडे यांनी केला. या संदर्भात सिटी कोतवाली येथे तक्रार दिली असून तक्रारीच्या प्रति गृहमंत्री, पोलीस महासंचालक,पोलीस अधीक्षक यांना पाठविल्या असून संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अमित पुरुषोत्तम गावंडे यांनी केली आहे.