अकोला दिव्य ऑनलाईन : भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या भारत कृषक समाज महाराष्ट्र राज्याचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांना काईट्स क्रॉप्ट प्रोडक्शन पंजाब व ग्लोबल चेंबर ऑफ कंझूमर राईट्स हरियाणा यांच्यातर्फे इंटरनॅशनल आयकॉन अवार्ड कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. लेमन ट्री हॉटेल गुरूग्राम हरियाणा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या,या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा, माजी चीफ जस्टीज अंतरेश्वर प्रतापसाही, ट्रेड कमिश्नर लॅटीन अमेरीकन कॉसिलच्या डॉ.सेनोरीटा, रिपब्लिक ऑफ गाम्बीयाचे हाय कमिश्नर मुस्तफा जवारा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या २८ वर्षापासून अखंडपणे कृषक समाजाच्या माध्यमातून शेतकरी व शेतमजुरांसाठी डॉ.मानकर झटत आहेत. अनेक गावात अन्याय झालेल्या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे. त्यांच्या समस्या, अडीअडचणी व मागण्यांबाबत केंद्र व राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू असतो. शेतकऱ्यांसाठी २ जनहीत याचिका नागपुर हायकोर्टात दाखल करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता.अनेक शेतकरी हिताच्या निर्णयात भारत कृषक समाजाचा सिंहाचा वाटा आहे. या पुरस्काराने डॉ. मानकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.