अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहरातील उड्डाणपूलावर मागून वेगाने येत असलेल्या कारने दिलेल्या जोरदार धडकेने घडलेल्या अपघातात दुचाकीवरील गंभीरपणे जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पुरुषाची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. शनिवारी घडलेल्या या अपघातानंतर कार चालक कारसह घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र आज रविवार दुपारी आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे..
अकोला येथील केशवनगर परिसरात राहणारे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी तानाजी दगडू सांगळे आणि त्यांच्या पत्नी रेखा तानाजी सांगळे हे अकोला रेल्वे स्थानकावरून मोटारसायकलने घराकडे निघाले.अग्रसेन चौकापासून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलावरून मोटारसायकल अशोक वाटिका चौकासाठी टाकली. अशोक वाटिका चौकाजवळ उड्डाणपुलावर पाठीमागून येणाऱ्या एम.एच 02 ए क्यू 7901 या क्रमांकाच्या कारने सांगळे यांच्या एम.एच 30 एक्स 779 क्रमांकाच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रेखा सांगळे (50) आणि त्यांचे पती तानाजी दगडू सांगळे (55) गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.
घटनेतील गंभीर जखमींचा मुलगा वैभव तानाजी सांगळे यांनी या घटनेची कालच सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान त्यांची आई रेखा सांगळे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.यामुळे सिव्हील लाईन पोलिसांनी MH-02-AQ-7901 या क्रमांकाच्या कार चालकाविरुध्द सिव्हील लाईन पोलिसांनी अप नं 394/24 कलम 106 (1), 281,125 (अ), 125 (ब) बी. एन. एस 2023 सह कलम 134,177 मोटर व्हेईकल ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविला. मात्र गाडी चालक फरार होता.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आरोपी गाडी चालक यास तात्काळ ताब्यात घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांना आदेश दिले. पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीने MH-02-AQ-7901 क्रमांकाची गाडी गंगानगर येथून ताब्यात घेतली. मात्र आरोपीचा ठाव ठिकाण लागला नव्हता.
आरोपीला शोधण्यासाठी पथके रवाना केली गोपनीय सूत्राकडून आरोपी दडून बसलेल्या ठिकाणची खबर लागली. विलंब न करता पथकाने आरोपी जवळ जावून त्याला जाळ्यात अडकविले. ताजनापेठ भागातील कागजीपुरा येथे राहणारा इस्माइल अहेमद मुमताज अहेमद याला ताब्यात घेतले. आरोपीला पुढील तपासकामी वाहनासह पोलीस स्टेशन सिव्हील लाईन यांच्या ताब्यात दिले.