अकोला दिव्य ऑनलाईन : दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा हवेतच विरली असून राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत. अकोला जिल्ह्यात 1 दिवसाआड 1 शेतकरी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. तर पश्चिम विदर्भात शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दरदिवशी 3 शेतकरी मृत्यूचा फास ओढत आहेत. यंदा 6 महिन्यात म्हणजेच जून 2024 अखेर 557 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये सर्वाधिक 170 शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या आहे.
दोन दशकापासून प्रत्येक राज्यकर्त्यांद्वारा शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र राज्य करण्याची घोषणा केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात या गंभीर विषयाकडे शासन-प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. एवढेच नव्हे तर शासन योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नाही. मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळणाऱ्या एक लाखांच्या शासन मदतीच्या निकषात 19 वर्षांपासून वाढ करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे.
दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारी, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे पश्चिम विदर्भात शेतकरी मृत्यूचा फास ओढत आहे. सन 2001 पासून राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रवण 14 जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतल्या जात आहे. त्यानुसार अमरावती विभागात आतापर्यंत 20,630 शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी 9,516 प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. मात्र, याची कारणमीमांसा जिल्हा प्रशासनाने केलेली नाही. शेतकरी आत्महत्यांची क्लस्टर शोधून उपाययोजना राबविण्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, पुढे काही झालेच नाही. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या सहा महिन्यात 170 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दर 30 तासात एक शेतकरी आत्महत्या होत असल्याची शोकांतिका आहे.
मार्च महिन्यात सर्वाधिक 117 प्रकरणे
अमरावती विभागात सहा महिन्यात 557 शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. सर्वाधिक 117 शेतकरी आत्महत्या मार्च महिन्यात झाल्या आहेत. जानेवारीत 90, फेब्रुवारीमध्ये 100, एप्रिल 96, मे 84 व जून महिन्यात 70 शेतकरी आत्महत्या झाल्या. जूनअखेर अमरावती जिल्ह्यात 170, यवतमाळ 150, बुलढाणा 111, अकोला 92 वाशिम जिल्ह्यात 34 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.