Wednesday, November 20, 2024
Homeसांस्कृतिकजय जगन्नाथ ! भर पावसात अकोल्यात भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा : भाविकांचा...

जय जगन्नाथ ! भर पावसात अकोल्यात भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा : भाविकांचा सहभाग

अकोला दिव्य ऑनलाईन : पुरी धाम येथील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेचे औचित्य साधून अकोला येथील इस्कॉन शाखेच्या वतीने रविवारी ७ जुलै सायंकाळी भर पावसात शहरातून रथयात्रा काढण्यात आली. भर पावसात निघालेल्या रथयात्रेत शेकडो भाविकांनी केलेल्या जय जगन्नाथच्या गजराने आसमंत निनादून गेला होता.इस्कॉनचे विदर्भ झोनल पर्यवेक्षक पूज्य अनंतशेषप्रभू यांच्या मार्गदर्शनात व अकोला इस्कॉनचे अध्यक्ष पूज्य वैदर्भीचरण प्रभूजी यांच्या पुढाकारात सरकारी बगीचा परिसरातील इस्कॉन सेंटर येथून सायंकाळी भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या रथात भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि माता सुभद्रा यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.

अकोला येथील इस्कॉन सेंटर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर, भगवान जगन्नाथाचा जयघोष करत भाविकांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, राणीसती धाम, गांधी रोड, सीटी कोतवाली चौक, खोलेश्वर, सरकारी बगिचा अशी मार्गक्रमण करत मित्र समाज क्लब येथे आली. त्या ठिकाणी रथ यात्रेचा समारोप करण्यात आला. शहरातील अनेक भाविक या रथयात्रेत सहभागी झाले होते. रथयात्रेत सहभागी इस्कॉनच्या सदस्यांनी रथयात्रेचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वितरण केले.

भाविकांनी पावसात धरला फेर
रथयात्रा सुरु होण्यापूर्वीच शहरात पावसाने जाेरदार हजेरी लावली. पाऊस सुरु असतानाच रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. रथयात्रेत सहभागी झालेल्या महिला व पुरुष भाविकांनी हरे रामा-हरे कृष्णाच्या धूनवर भर पावसात फेर धरला. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!