अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहर व जिल्ह्यात जिल्ह्यात काल रविवारी दुपारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शहर व जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. या पावसाचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला असून अनेक ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास २२ तासांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळेन शहरातील अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी घुसून नागरिकांच्या सामानाचे नुकसान झाले आहे. चांदूर खडकी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा मार्ग बंद आहे. तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून पाण्याची पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष देऊन आहेत. सुदैवाने या परिस्थितीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अकोला तालुक्यात काल रविवार ७ जुलैला दुपारी २ वाजल्यापासून पावसाने सुरुवात केली होती. आज सोमवार ८ जुलैला ११ वाजता संततधार पावसाला २१ तासाचा कालावधी उलटूनही पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीला मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि सकाळी ९ वाजेपर्यंत जोर कायम ठेवून होता.यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली.
अकोला तालुक्यातील खडकी, चांदुर, उगवा, भौरद, म्हैसांग, गांधीग्राम, बाभुळगाव या भागात पाणी वाढल्याने बिकट स्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक मार्गावर पावसाचं पाणी साचल्याने वाहतुकीस रस्ता बंद झाला आहे. पावसाचा जोर अजूनही ओसरला नसल्याने सोमवारीही पूरस्थिती वाढण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नदी किनारी भागतील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.