अकोला दिव्य ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रात सर्वाधिक १३ जागा जिंकल्या तर सांगली येथील काँग्रेस बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील देखील निवडून आल्यानंतर काँग्रेसमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे काँग्रेसकडे एकूण १४ खासदारांचे बळ आहे. अशात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस २८८ मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवून पक्ष संघटनेची रणनीती आखत असल्याचं दिसून येते. या अनुषंगाने अकोला जिल्हा कॉंग्रेस कमिटीला इच्छुकांचे अर्ज मागवून घेण्यास प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र पाठविले आहे.
पत्रात काय म्हटलंय?
इच्छुक उमेदवारांचा अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात १० ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावेत. विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण वर्गासाठी २० हजार आणि अनु जाती, जमाती, महिला उमेदवारांसाठी १० हजार रुपये पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नावे डी.डीद्वारे किंवा जिल्हा कमिटीकडे जमा करावेत.जे अर्ज पक्षनिधीसह जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडे जमा होतील. ते अर्ज पक्षनिधीसह प्रदेश काँग्रेस कमिटीकडे १० ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावेत.
काँग्रेसकडून इच्छुकांना पत्र गेले आहे. राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे. असं पत्रात म्हटले आहे. यामुळे विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून ही माहिती कळविण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.