अकोला दिव्य ऑनलाईन : भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त निमित्ताने येत्या ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान रद्दीचे संकलन करून, या रद्दीला विकून येणारी रक्कम थॅलेसिमीया आजाराच्या दहा रुग्णांचा वर्षभराच्या उपचारासाठी खर्च केली जाणार आहे. नागरिकांनी या अभियानात आपल्या घरातील रद्दी देवून सहभागी व्हावे, असे आवाहन निलेश देव मित्र मंडळ व अँड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने केले आहे.
थॅलेसिमीया आजाराने ग्रस्त बालके जिल्ह्यात शेकडोच्या संख्येने आहेत. या मुलांना दर १५ ते २० दिवसातून रक्त चढवावे लागते. त्यामुळे वर्षाकाठी रक्त चढविण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात येतो. अनेक पालकांची एवढा खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती नसते. मात्र तरीही रक्त चढवावे लागते. आज अनेक संस्था, संघटना पुढाकार घेत आहेत. भारताच्या राज्यघटनेला ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. यानिमित्ताने एक नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचा मानस ठेवून निलेश देव मित्र मंडळ, अँड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने थॅलेसिमीयाच्या दोन रुग्णांचा वर्षभराचा खर्च करता यावा, यासाठी रद्दी संकलनाचा उपक्रम राबविला जाणार आहे.
या सेवाकार्यात इच्छुक नागरिकांना आपल्या घरातील रद्दी अँड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे कार्यालय पुष्कर अपार्टमेंट सातव चौक, जठारपेठ येथे तसेच देव ट्रेडर्स, न्यु तापडीया नगर, निलेश पवार, हॉटेल टेस्टी बाईट, राऊतवाडी, राजु कनोजिया, राजेश्वर ड्रायक्लिनर तापडिया नगर,मनीष अभ्यंकर, अभ्यंकर डेअरी, जठारपेठ येथे देता येईल. तसेच निलेश देव मित्र मंडळच्या वतीने दिनांक ५ ते ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत रद्दी संकलनासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी आपली रद्दी देण्यासाठी 98601 22555 या क्रमांकावर संपर्क साधावा.
डॉ.हेडगेवार रक्तपेढीकडून ६० बालकांचे पालकत्व
डॉ.हेडगेवार रक्तपेढीने थॅलेसिमिया आजाराच्या ६० बालकांसाठी रक्ताचे पालकत्व स्वीकारले आहे. रुग्णांना लागणारे रक्त त्यांच्या गरजेनुसार डॉ. हेडगेवार रक्त केंद्र येथून नि:शुल्क अर्थात तपासणी शुल्क न घेता दिल्या जाते.