अकोला दिव्य ऑनलाईन : राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने आवश्यक दाखल्यांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची सेतू सेवा केंद्रांवर झुंबड उडाली असताना दुसरीकडे आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या ॲपवर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी ‘ नारी शक्ती दूत ‘नावाचे ॲप उपलब्ध झाले आहे. स्मार्टफोनमध्ये ‘ गूगल प्ले ‘ ॲपच्या माध्यमातून आॕनलाईन अर्ज भरता येते. रहिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आदी आवश्यक दाखले व कागदपत्रे आॕफलाईन पध्दतीने दाखल केल्यानंतर त्याची माहिती आॕनलाईन भरावी लागते. १० एमबी क्षमतेचे नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड केल्यानंतर पुढे पहिल्या टप्प्यातच अटी व शर्ती मान्य करून लागीन करताना ॲपवर तांत्रिक अडचण येते.
ॲपवर आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी केंद्रातील सेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु स्मार्टफोनवर ॲप डाऊनलोड केल्यानंतर प्रत्यक्षात ॲप सुरू होत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येत नसल्याची अडचण समोर येत आहे. त्याचा त्रास संबंधित अंगणवाडी सेविकांसह अर्जदार महिलांना सहन करावा लागत आहे. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले मिळण्यासाठी सेतू सेवा केंद्रांवर महिलांची गर्दी उसळली आहे. शासनाने काही कागदपत्रांमध्ये सवलती दिल्या असल्या तरी सेतू सेवा केंद्रांवरील महिलांची गर्दी कमी होत नाही. आवश्यक दाखले मिळवून देण्यासाठी खासगी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. त्यासाठी महिलांना दिवसभर सेतू सेवा केंद्रांवर दिवसभर तिष्ठत राहावे लागत असताना दाखले मिळण्यासाठी एजंटाना जादा पैसे द्यावे लागत आहेत. यात आर्थिक पिळवणूक होत असताना दुसरीकडे आॕनलाईन अर्ज भरण्यातही तांत्रिक अडचण येत असल्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
तूर्त आॕफलाईन अर्ज भरून घेणार
लाडकी बहीण योजनेसाठी आॕनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि सेविकांवर आॕनलाईन अर्ज भरून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा विचार करता आॕनलाईन अर्जा भरतानाची तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या महिलांचे आॕफलाईन अर्ज अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.