अकोला दिव्य ऑनलाईन : उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १४० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वसामान्य लोकांना मोक्षप्राप्तीसाठी उपदेश देण्यासाठी स्वतःच्या सत्संगाचे आयोजन करणारा ‘नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा’ अद्यापही फरार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या संत्सगाचा आयोजक नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा अद्यापही फरार आहे, असं उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी सांगितले असल्याचे वृत्त आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०५, ११०, १२६, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत ‘मुख्य सेवेदार’ असलेले देवप्रकाश मधुकर आणि चेंगराचेंगरी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांची संख्यादेखील मोठी आहे. हाथरसमधील शासकीय रुग्णालयात आतापर्यंत जवळपास एक हजारहून अधिक लोकांना दाखल करण्यात आलं असून रुग्णालयाची रुग्णांना दाखल करून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना या दुर्घटनेतील रुग्णांना दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या घटनेच्या चौकशीसाठी एक उच्च स्तरीय समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय या घटनेतील मृतकांच्या कुटुबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आली आहे.
पोलिसाला हृदयविकाराचा झटका
या सत्संगाच्या बंदोबस्तासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) तैनात करण्यात आली होती. मात्र ही चेंगराचेंगरी आणि मृतदेहांचा खच पाहून क्यूआरटी पथकातील पोलीस शिपाई रवी यादव यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रवी यादव मृतदेहांची व्यवस्था करत असताना त्यांनी एकाच वेळी इतके मृतदेह पाहिल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.