अकोला दिव्य ऑनलाईन : टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकण्यासाठीच्या काल शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिक पंड्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने सीमा रेषेवर डेव्हिड मिलरचा करिष्माई झेल घेतल्याने दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा धुळीस मिळाल्या. सूर्यकुमार यादवचा हा झेल सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. मात्र, सूर्यकुमार यादवच्या या झेलबद्दल सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ सुरू आहे.
दक्षिण आफ्रिकेतील मीडिया आणि त्यांचे काही चाहते टीम इंडिया आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत. एका चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्याने झूमच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर केला असून सूर्यकुमार यादवच्या पायाचा सीमारेषेला स्पर्श झाल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला टी-२० विश्वचषक विजेतेपदापासून वंचित राहावे लागले की काय असा आरोप काही चाहते करत आहेत. अंपायरने घाईघाईत चुकीचा निर्णय दिल्याचे सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे. काही चाहत्यांनी सीमारेषेचे नियम सांगताना म्हटले की सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल षटकार होता.
हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मिलरला झेलबाद केले. हा उत्कृष्ट झेल सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर धावत जाऊन घेत सामन्याला मोठी कलाटणी दिली. ज्यामुळे हा सामना भारतीय संघाच्या पारड्यात झुकला. त्यानंतर या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रबाडाने चार धावा केल्या. रबाडाने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. महाराजने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्याचा पुढचा चेंडू वाईड होता. हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला बाद केले. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि भारताने सात धावांनी विजय मिळवला.