अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहरात गुन्हेगारी वाढत चालली असून, गुन्हेगारांची हिम्मत एवढी वाढली आहे की, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका घरात घुसून रात्री ९ वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी चाकूच्या धाकावर सोन्याचे दागिने आणि मोबाईल लुटून नेले. घटनेची माहिती मिळताच आळशी प्लॉट परिसरात एकच खळबळ उडाली असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा पर्यंत जाबजबाब घेणे सुरु होते. वृत्त लिहिस्तोवर चोरट्यांचा सुगावा लागला नाही.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच आळशी प्लॉट परिसर असून, या भागात वास्तव्यास असलेल्या अमृतलाल केडिया यांच्या घरात अज्ञात व्यक्तींनी शिरकाव केला आणि चाकूचा धाक दाखवून केडिया यांच्या घरातील महिलांच्या अंगावरील दाग-दागिने काढले, सोबतच केडिया यांच्या गळ्यातील चेन आणि कामावर असलेल्या मोलकरीणचे दागिने लुटून पोबारा केला. घटना रात्रीच्या ९ वाजताच्या सुमारास घडली असून, लुटरु 5 जण होते. सर्वजण चारचाकी वाहनाने आले आणि लुट करुन त्याच चारचाकीने पोबारा केला.
अलिकडच्या काळात शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून आज घडलेल्या घटनेने तर गुन्हेगारांनी पोलिसांना आव्हानच दिले. हाकेच्या अंतरावर असलेल्या एसपी ऑफिस लागत असलेल्या परिसरातील रहिवासी सुरक्षित नाही तर इतरांच्या सुरक्षिततेचे काय ? या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.