Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीपुणे येथून निघालेल्या तरुणाचा घातपात ? अकोला स्थानकावर सापडली बॅग

पुणे येथून निघालेल्या तरुणाचा घातपात ? अकोला स्थानकावर सापडली बॅग

Akola divya News 24 : youth-missing-railway-station : पुणे येथून आपल्या मुळ गावाला परत जाण्यासाठी अकोला येथे रेल्वेने आलेला तरुण तर घरी पोहचलाच नाही. उलटपक्षी अकोला रेल्वे स्थानकावरील एका बेंचवर लॅपटॉप, मोबाईल व इतर साहित्य असलेली युवकाची कॉलेज बॅग आढळून आली. बेपत्ता असलेला तरुण आपल्या मूळ गाव बार्शीटाकळीला पोहोचला नाही आणि पुण्यातही परतला नाही, यामुळे त्याचे काही बरं वाईट झालं की काय ? या विचाराने मागील आठ दिवसापासून युवकाची आई आणि कुटुंबीय चिंतेत सापडले आहेत. अकोला आणि पुणे पोलिस युवकाचा शोध घेत आहेत.

बार्शीटाकळी येथील भावसारपुरातील रहिवासी आशिष गजानन बोपुलकार असे या बेपत्ता युवकाचे नाव आहे. तो तीन वर्षापासून पुणे येथील भोसरी परिसरातील देविदास नामदेव गिरणे यांच्या खोलीत भाड्याने राहत होता. मागील आठवड्यात आशिष व त्याच्या आईचे मोबाईल फोन द्वारा बोलणे झाले होते. सकाळी बोलणे झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद येत होता. त्यामुळे परिवारातील सर्व सदस्य चिंतेत पडले. 

दरम्यान पुणे गाठून आशिषचा मोठा भाऊ अक्षय बोपूलकार यांनी घरमालकाची भेट घेतली असता, घर मालकाने सांगितले की, आशिष 16 जून रोजी सकाळी 10:30 वाजताच्या  सुमारास खोली खाली करून गावी जात असल्याचे सांगून साहित्य घेऊन निघून गेला. मात्र आशिष अकोला बार्शीटाकळीत देखील पोहोचला नाही. त्यामुळे आशिषच्या भावाने यासंदर्भात पुणे येथील भोसरी पोलीस स्टेशन मध्ये तो बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.

अकोला रेल्वे स्थानकावर 18 जून रोजी आशिषची कॉलेज बॅग एका बेंचवर बेवारस स्थितीत मिळून आली. त्यामध्ये त्याचा लॅपटॉप, बंद पडलेला मोबाईल व इतर साहित्य होते. आशिषची बॅग सापडल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. बॅग अकोल्यात मिळाली पण आशिष दिसला नाही. त्यामुळे त्याचे काही कोणी बरे वाईट केले का? अथवा तो कुठे निघून गेला की त्याचे कुणी अपहरण केले. किंवा त्याने टोकाचे पाऊल उचलले का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत .

आशिषचे वर्णन
बेपत्ता आशिषचा बांधा मध्यम आणि वर्ण सावळा असून नाक बसके आहे. चेहरा उभाट आहे. त्याची उंची 5.5 फूट आहे. डोक्याचे केस काळे पांढरे आहेत. त्याने बी. आर्क. पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याला मराठी हिंदी व इंग्रजी भाषा अवगत आहे. पांढऱ्या रंगाचा चौकडी शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. काळा रंगाची सॅडल घातलेली आहे.

शोध कार्य सुरू
बेपत्ता अक्षयची बॅग अकोला रेल्वे स्थानकावर मिळून आली आहे. त्यामुळे अकोला रेल्वे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी अर्चना गाढवे व त्यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून नेमकी बॅग कोणी ठेवली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्या बाकावर ती बॅग ठेवली होती. तो बाक सीसीटीव्ही परिक्षेत्रात नसल्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र आशिषचा शोध घेण्याचे अकोला रेल्वे पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. बेपत्ता आशिष बाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पुणे भोसरी पोलीस ठाण्यात अथवा अकोला रेल्वे पोलीस ठाणे किंवा बार्शीटाकळी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!