Sunday, September 8, 2024
Homeसामाजिक29 जुनला संकल्प प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पथकची संकल्पपूर्ती......

29 जुनला संकल्प प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पथकची संकल्पपूर्ती……

अकोला दिव्य ऑनलाईन : संकल्प प्रतिष्ठानकडून दरवर्षी गरजू संस्थेसाठी संकल्प घेऊन, ढोल ताशांचे वादन करुन जमा झालेली रक्कम गरजू संस्थेस सुपूर्त करत असते. वर्ष २०२२-२०२४ साठी संकल्प प्रतिष्ठानने अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक या संस्थेची ‘संकल्प’ साठी निवड केली होती. या संकल्पात, संकल्प प्रतिष्ठानने संत गाडगे बाबा शोध व बचाव पथकाला ११ लाख ११ हजार १११ रुपये एवढ्या रक्कमेचे साहित्य बचाव कार्यासाठी सुपूर्त केले.

जिल्ह्यात व परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक सेवा कार्यक्रमात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व एखादी सामाजिक समस्या नागरिकांसमोर मांडून, त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थेची माहिती घेऊन त्यांना सहकार्य व्हावे म्हणून सन २०१५ साली अकोल्यात संकल्प प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पथकाची स्थापना झाली. सात वादकांपासून सुरु झालेल्या या पथकाचे वटवृक्ष होतांना आज सगळे अनुभवत आहेत. ज्या सामाजिक संस्थेला कुठलीही थेट सरकारी मदत नाही. अश्या संस्थेची निवड संकल्प प्रतिष्ठान दरवर्षी करत असते. त्यांना मदत करण्यासाठी धार्मिक कार्यक्रमात आपली वादन कला सादर करुन मिळालेली रक्कम मदत स्वरूपात दिली जाते. या पथकातील कुठलाही वादक मानधन घेत नाही. २०२२-२०२४ या दोन वर्षासाठी संकल्प प्रतिष्ठानने आपले सगळे वादन संत गाडगे बाबा बचाव पथकाला मदत करायचे म्हणून केले.

२०२२ साली संकल्प प्रतिष्ठानने पत्रकार परिषद घेऊन त्या वर्षीचा संकल्प जाहीर केला होता. पिंजर येथील गाडगे बाबा बचाव पथकाला ११ लक्ष एवढ्या रक्कमेचे बचाव कार्यात लागणाऱ्या साहित्याची पूर्तता करण्याचा संकल्प घेतला होता. यामधे ड्रोन कॅमेरा, रेक्यू बोट, आपत्कालीन रुग्णवाहिकेतील जनरेटर, स्कुबा डायविंग किट्स इत्यादी साहित्यांची पूर्तता आता करण्यात आली आहे. या सर्व साहित्यामुळे आता बचाव कार्य तर जलद गतीने पूर्ण होणारच, मात्र त्या सर्व उच्च दर्जाच्या साहित्यामुळे बचाव कार्यातील स्वयंसेवकांचा जीव सुद्धा सुरक्षीत राहिल, असा शुध्द भाव मनात बाळगून हा संकल्प घेण्यात आला होता.

दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या संकल्पानुसार ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे साहित्य सुपूर्त करुन पूर्ण केले. हा संकल्प पूर्ण करण्यात गणपती, नवदुर्गा मंडळ, शिवजयंती, गुढीपाडवा उत्सव समिती, विविध सामाजिक, धार्मिक संस्था यांच्या हातभार लागला. तसेच वादन दरम्यान ज्याला जसे शक्य तेवढी आर्थिक स्वरूपात मदत केली. सोबतच समाजातील नागरिकांना या संकल्पाबद्दल माहिती होताच, त्यांनी संकल्प प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना घरी बोलवून या कार्यात मोठे आर्थिक समर्पण दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व वादकांनी आपला घाम गाळत वादन करुन हा संकल्प पूर्णत्वास नेला.

संकल्पपूर्तीचा कार्यक्रम येत्या २९ जूनला अकोला येथील माहेश्वरी भवन येथे अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार तसेच अकोला जिल्हा पोलीस आयुक्त बच्चन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. अशी माहिती पथकाचे समन्वयक राम राठी यांनी दिली. पत्रकार परिषदेला पथकाचे प्रमुख प्रथमेश गोखले, कोषाध्यक्ष गायत्री देशपांडे, वरुण बुरंगे व अभिजीत भाटवडेकर उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!