अकोला दिव्य ऑनलाईन : विविध नाविन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबविताना गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात नदी/ विहिरीमधे टाकले जाणारे निर्माल्य गोळा करून त्यापासून निर्मित खत गेल्या १२ वर्षांपासून नागरिकांना वाटणार-या ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाकडून यावर्षीही निर्माल्य खतांचा 3 हजार पाकिटाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
निर्माल्यामुळे होणारे पाणी प्रदूषण या बाबीची दखल घेऊन, सन 2012 मध्ये ॲड. धनश्री देव यांनी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात नदी, विहिरी किंवा नाल्यांमध्ये फेकले जाणारे निर्माल्य नागरिक तसेच सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळाकडून गोळा करण्यासाठी निर्माल रथ फिरविण्यात आला. गोळा झालेल्या निर्माल्यापासून तयार केलेल्या खताचे वाटप केले. वृक्षारोपण करून त्या वृक्षांना हे खत टाकण्याचे आवाहन केले. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक वृक्षारोपण करू लागले. यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड तापमानापासून थोडाफार फायदा होऊ लागला. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि हा उपक्रम त्यानंतर दरवर्षी राबविला जाऊ लागला.
महापालिकेकडून सुद्धा निर्माल्य रथ शहरात फिरविला जाऊ लागले. ॲड. धनश्री देव यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन सन 2019 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. त्यानंतर ॲड. धनश्री देव यांचे निधन झाले. परंतु निलेश देव मित्र मंडळाने हा उपक्रम सुरु ठेवला. मुंबईनंतर केवळ अकोल्यामध्ये निर्माल्य गोळा करून त्यापासून खत निर्मिती आणि वाटप, हा उपक्रम राबविला जातो. मागील वर्षी गोळा करण्यात आलेल्या निर्माल्यामधून तयार झालेल्या खताचे अर्धा-अर्धा किलोची 3 हजार पाकिट निलेश देव मित्र मंडळाच्या माध्यमातून शहरात वाटल्या जात असून वृक्षारोपण करून त्या वृक्षांना हे खत देण्याचे आवाहन केले जात आहे. या उपक्रमाचे अकोलेकरांकडून कौतुक होत आहे.