अकोला दिव्य ऑनलाईन : भेटी लागे जीवा…..! च्या गजरात पंढरीनाथाच्या भेटीसाठी जाणाऱ्या पंढरपुरच्या वारकऱ्यांना मागील ३३ वर्षापासून अखंड मोफत वैद्यकिय सेवा देणारे अकोला येथील श्री गोपाल कृष्ण गो-सेवा अनुसंधान केंद्र, कानशिवणीचे फिरते वैद्यकिय सेवा पथक येत्या रविवार ३० जुनला अकोला येथून पंढरपुरकडे रवाना होत आहे.
स्थानिक रतनलाल प्लॉट, नेकलेस रोडवरील एल.आर.टी कॉलेज समोरच्या गिरीष पंड्या यांच्या निवासस्थानावरून ह.भ.प. मोहन महाराज (गोकथाकार) व ह.भ.प. सुजीत महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत रविवार ३० जुनला सकाळी ९ वाजता प्रस्थान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वैद्यकिय पथकामध्ये तीन अवजड वाहने, १७ तज्ञ डॉक्टर आणि ३८ स्वयंसेवकांचा समावेश आहे. पथकाद्वारे वारकऱ्यांना मिष्टान्नाचे वितरण, रुग्ण चिकित्सा, नेत्रचिकित्सा, चष्मा वितरण, चरण सेवा (मालीश), मलमपट्टी, विशेष होमिओपॅथी उपचार इत्यादी विनामूल्य सेवांचा समावेश आहे. हे सेवा कार्य ३० जुन ते १७ जुलैपर्यंत चालणार आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व मोफत फिरते वैद्यकिय पथकाच्या सेवा कार्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो आहे. त्याचे नियोजन आयोजकांनी केले असले तरी समाजातील बांधवांनी या सेवा कार्यात धन, धान्य व अन्य उपयोगी स्वरूपात मदत करून या कार्यात यथोचित वाटा उचलावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.त्यासाठी प्रकाश वाघमारे ( 9720 2314 56) यांच्या सोबत संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.