अकोला दिव्य ऑनलाईन : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी तथा अकाेट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालीदास तापी यांच्याविराेधात महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केल्या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. एकाच प्रकरणात दाेन गटविकास अधिकाऱ्यांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महिला ग्रामसेविकेच्या तक्रारीनुसार हिंगाेली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्याविराेधात १५ जून राेजी रामदास पेठ पाेलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. आता याप्रकरणी अकाेट पं.स.मध्ये गटविकास अधिकारी पदावर कार्यरत तथा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार पाहणारे कालीदास तापी यांच्याविराेधात संबंधित महिला ग्रामसेविकेच्या तक्रारीनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार तापी यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात तसेच अकाेट येथील पंचायत समिती कार्यालयात विनयभंग केला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार रामदास पेठ पाेलिसांनी गुरुवारी ३५४ अ,आणि ३५४ ड नुसार गुन्हा दाखल करुन तापी यांना नाेटीस जारी केली आहे.
घटनास्थळ सिटी काेतवाली तरीही…
दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीनुसार जिल्हा परिषद कार्यालयात विनयभंग घडला. सदर कार्यालय सिटी काेतवाली पाेलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे फिर्यादीने सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात तक्रार देणे क्रमप्राप्त हाेते. परंतु फिर्यादी महिला रामदास पेठ पाेलिस ठाण्यातच तक्रार देण्यावर ठाम असल्यामुळे याप्रकरणी पाेलिस निरीक्षक मनाेज बहुरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. वरिष्ठांच्या निर्देशानुसार रामदास पेठ पाेलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली.