Thursday, December 26, 2024
Homeसामाजिकवैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव! अकोला-बुलढाणा जिल्ह्यातून 18 हिंदुत्वनिष्ठचा सहभाग

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव! अकोला-बुलढाणा जिल्ह्यातून 18 हिंदुत्वनिष्ठचा सहभाग

अकोला दिव्य ऑनलाईन : ५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत निर्मित प्रभु श्रीरामाचे मंदिर हे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर देशातील परिस्थिती पहाता हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची इकोसिस्टम निर्माण करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता आहे. या निवडणुकीत अवैध घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान करणे, हे भारताच्या लोकशाहीला धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे २०११ नंतर २०२१ मध्ये जनगणना न झाल्याने मागील १३ वर्षांत भारताच्या जनसंख्येत काय बदल झाले, ते त्वरीत जनगणना करून जनतेच्या पुढे मांडण्याची आवश्यकता आहे. तसेच सीएए व एनसीआर संपूर्ण भारतात त्वरीत लागू केले पाहिजे.
देशाच्या सुरक्षिततेचा विचार केला तर काश्मीरमधील आतंकवाद आता हळूहळू हिंदुबहुल जम्मूच्या दिशेने सरकत आहे. खलिस्तान चळवळीसह राष्ट्रविरोधी व विदेशीशक्ती सक्रीय झाल्या आहेत. भारतासह जगभरातील हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. अशा वेळी हिंदूंना जातीपातीच्या भांडणात गुंतवून त्यांच्यात फूट पाडण्याचे षड्यंत्र आखले जात आहे; मात्र हिंदु राष्ट्राच्या मार्गात असे कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी हिंदूंच्या संघटनामुळे विरोधकांच षड्यंत्र यशस्वी होणार नाहीत.

जागतिक स्तरावर विविध देशांमधील वाढत जाणारी युद्धे-अस्थिरता पाहता हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो विश्वबंधुत्व आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडून सर्व समाजाला जोडू शकतो अन् एकसंघ ठेवू शकतो. यासाठीच हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यंदा बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे होत आहे, या संदर्भात अकोला शहरातील हॉटेल मिर्च मसाला, गोरक्षण रोड येथे या अधिवेशनाला सहभागी होणाऱ्या हिंदुत्वनिष्ठाची बैठक पार पडली,

यंदाच्या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांचे परिसंवाद, तसेच प्रत्यक्ष समान कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी गटचर्चा असतील. ‘सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा’, ‘धर्म आणि राष्ट्रविरोधी नॅरेटीव्हला प्रत्युत्तर’, ‘हिंदु समाजाच्या रक्षणाचे उपाय’, ‘हिंदु राष्ट्रासाठी संवैधानिक प्रयत्न’, ‘मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे उपाय’, ‘वैश्विक स्तरावर हिंदुत्वाचे रक्षण’, ‘देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्‍या हलाल अर्थव्यवस्थेवर उपाय’, ‘लँड जिहाद’, ‘काशी-मथुरा मुक्ती’, ‘गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे’ यांसारख्या विविध विषयांसोबतच हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विविध विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे.

या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, घाना आणि दक्षिण आफ्रिका या देशांतून प्रतिनिधी येणार आहेत. भारतातील २६ राज्यांतील १ हजाराहून अधिक हिंदु संघटनांच्या २ हजार प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रामुख्याने इंदूरचे महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगडचे रामबालकदास महात्यागी महाराज, छत्तीसगढ ‘शदाणी दरबार’चे डॉ. युधिष्ठिरलाल महाराज यांची उपस्थितीही राहणार आहे.
याशिवाय श्रीरामजन्मभूमी मुक्ती तसेच ज्ञानवापी मशिद विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन, त्यांचे पुत्र अँड.विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालयाच्या अँड.अश्विनी उपाध्याय, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, तेलंगणाचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक कपिल मिश्रा, देशाचे माजी माहिती आयुक्त व ‘सेव कल्चर सेव भारत’चे संस्थापक उदय माहूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त तसेच समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

अकोला जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक, अधिवक्ता, हिंदुत्ववादी संघटना असे 18 जण सहभागी होणार आहेत, त्यामध्ये अकोला येथील शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चोपडे, शिवसेना महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, अधिवक्ता मुकुंद जालनेकर, राष्ट्र जागृती मंच संस्थापक व उद्योजक संजय ठाकूर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ राष्ट्रीय संघटक मंत्री उदय महा, हिंदू महासभा श्रीराम पांडे, अँड. सागर जोशी पूर्व मंडळ अध्यक्ष अँड. अरुणा गुल्हाने, अँड. रवी लक्ष्मण जूनजाळेकर, अँड.जगन्नाथ गुल्हाने, अँड. पवनेश अग्रवाल, अँड.राजू मंजुळेकर विहिप प्रखंड प्रमुख,स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन अध्यक्ष रवींद्र फाटे, सोशल वर्क फॉर कॉन्सिल पतियंत मेंबर ऑफ हिंदू विधी अँड.कैलास शर्मा, डॉ. संतोष पस्तापुरे, अँड.राहुल चुटके, तर बुलढाणा जिल्ह्यातून शिव आरती संघटन अध्यक्ष जितेंद्र मोरे, युवा हिंदू प्रतिष्ठान खामगावचे संस्थापक अध्यक्ष रोहित पगारिया असे 18 हिंदुत्वनिष्ठ या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या ‘फेसबुक’द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!