प्रसिद्ध बॉलीवूड गायिका अलका याग्निक या सुमारे तीन दशकांहून अधिक काळापासून त्यांच्या सुमधूर आवाजाने भारतीयांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या अलका याग्निक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. अलका याग्निक यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांना एक दुर्मीळ आजार झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विषाणूच्या हल्ल्यामुळे त्यांना ‘रेयर सेंसरी न्यूरो नर्व हियरिंग लॉस’ आजार झाल्याचे समोर आले आहे. म्हणजेच अचानक त्यांना ऐकायला येणे बंद झाले. तुम्हाला या आजाराविषयी माहिती आहे का? हा दुर्मीळ आजार कोणाला होऊ शकतो?
या आजारामागील कारणे काय आहेत? या विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.गायिका अलका याग्निक यांना अचानक ऐकायला येणे बंद झाले. “या आजारात अनेकदा एका कानाने कमी ऐकू येते आणि काही दिवसांनंतर हे लक्षण आणखी वाढू शकते. पॉप संगीतामुळे हा आजार अल्प कालावधीसाठी किंवा आयुष्यभरासाठी होऊ शकतो. या आजारामध्ये आतून आवाज येणे, कान सुन्न होणे, चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात”, असे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे ईएनटी सल्लागार डॉ. मुरारजी घाडगे द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात.
यामागील कारणे कोणती असू शकतात?
पुणे येथील कान, घसातज्ज्ञ प्रा. डॉ. मिलिंद भोई यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले की, अचानक ऐकायला येणे बंद होणे यामागे खालील कारणे असू शकतात.
१. व्हायरल इन्फेक्शन
२. कानाला किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी करणे
३. मेंदूमध्ये गाठ असणेप्रा.
डॉ. मिलिंद भोई पुढे सांगतात, “उपचार करण्यापूर्वी एमआरआय ब्रेन आणि ऑडिओमेटरी म्हणजे ऐकण्याची क्षमता तपासावी. या टेस्ट केल्यानंतर आपल्याला अचूक कारण कळू शकते, त्यानुसार पुढचा उपचार आपण घेऊ शकतो.”डॉ. मुरारजी घाडगे सांगतात, “हर्पस सिम्प्लेक्स, मिझलेस, मम्प्स आणि व्हेरिसेला-झोस्टर यांसारख्या विषाणूंमुळे (herpes simplex, measles, mumps, and varicella-zoster virus) वेगवेगळे संसर्ग होऊ शकतात. या विषाणूंचा ऐकून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अचानक ऐकण्याची क्षमता कमी होते.”ते पुढे सांगतात, “अचानक ऐकू न येणे हा खूप दुर्मीळ आजार आहे, जो वर्षातून एक लाख लोकांपैकी ५ ते २० लोकांना होऊ शकतो. हा आजार अनेकदा इडिओपॅथिक (idiopathic) असतो, ज्याचे कारण अज्ञात असते.”
हा आजार कसा बरा होतो?
डॉ. घाडगे म्हणाले, “विषाणूमुळे श्रवणशक्ती कमी झाली असेल तर उपचारामध्ये कॉर्टिकोस्टिरॉईड्सचा उच्च-डोस घेऊ शकता, ज्यामुळे कानात जळजळ वाटणे कमी होते आणि कानाच्या आतील सूज कमी होते. संसर्गजन्य आजाराचा संशय असल्यास अँटीव्हायरल औषधी फायदेशीर ठरू शकतात, पण त्याचा परिणाम होईलच असे नाही.”डॉ. घाडगे सांगतात, “पहिल्या दोन आठवड्यांत सुमारे ३०-६० टक्के प्रकरणांमध्ये फरक दिसून येतो. काही रुग्णांमध्ये तीन महिन्यांनंतर फरक दिसून येतो, त्यामुळे लक्षणे दिसताच त्वरीत उपचार घेणे महत्त्वाचे आहे.”
कोणती काळजी घ्यावी?
डॉ. घाडगे सांगतात, संपूर्ण आरोग्याची काळजी घेणे, मोठ्या आवाजापासून कानांचे संरक्षण करणे, कानामध्ये कोणत्याही प्रकारचे संक्रमण होऊ नये म्हणून स्वच्छता पाळणे; याशिवाय संसर्गजन्य रोगांमुळे जर श्रवणशक्ती कमी होत असेल तर वेळेवर लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.प्रा. डॉ. मिलिंद भोई सांगतात, “जे लोक सतत हेडफोन लावतात किंवा हेडफोन कानाला लावून झोपतात, त्यांच्या कानाच्या पडद्यावर तीव्र आवाजाचा थेट परिणाम होतो, ज्यामुळे कमी ऐकू येऊ शकते. जे लोक सतत कानावर हेडफोन लावतात, त्यांनी हेडफोन कमी वापरावे.
अलका याग्निक एक्स वर लिहितात की
माझे चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि शुभचिंतक, काही दिवसांपूर्वी मी एका विमान प्रवासातून बाहेर आले आणि मला अचानक ऐकू येईनासं झालं. मला सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस नावाचा एक मेंदूचा दुर्मीळ आजार झाला आहे, डॉक्टरांनी याबाबत निदान केले आहे. या अचानक झालेल्या आजारामुळे मला धक्का बसला. मी आजाराचा सामना करत समोर आलेल्या नव्या गोष्टींबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या कठीण काळात तुमचा पाठिंबा आणि प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
अलका याग्निक यांनी चाहत्यांना आणि तरुणाईला विनंती केली आहे की, मोठ्या आवाजात हेडफोन लावून गाणी, संगीत ऐकू नका.