अकोला दिव्य ऑनलाईन: भारतात रोजगाराचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. मात्र केंद्र सरकार आणि विविध राज्यांतील भाजपमित्र पक्षाचे सरकार असलेल्या विविध राज्यांतील राज्य सरकार हे मान्य करायला तयारच नाही. महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नसून, नागपूर पोलीस व कारागृह विभागाच्या २०२२-२३ च्या भरती प्रकियेतील शारीरिक चाचणीला १९ जूनपासून सुरुवात होणार आहे. या दोन्ही विभागांच्या ६०२ जागांसाठी एकूण ८५ हजार २८४ अर्ज आले आहेत. सरासरी एका जागेमागे १४१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
केवळ नागपूर पोलीस मुख्यालयातर्फे पोलीस शिपायांच्या ३४७ व कारागृह विभागाच्या २५५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस शिपाईपदांसाठी एकूण २९ हजार ९८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात ७ हजार ७१३ महिला व पाच तृतीयपंथींयांचा समावेश आहे. तर कारागृहातील भरतीसाठी ५५ हजार २९७ अर्ज मिळाले असून त्यात १५ हजार ६१८ महिला व पाच तृतीयपंथी आहेत.
पोलीस शिपाई, चालक,सशस्त्र पोलिस शिपाई, कारागृह विभाग शिपाई पदासाठी बुधवार १९ जून पासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलिस मुख्यालयात शारीरिक चाचणी होणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक राबविली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे व गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील हे निवड मंडळाचे अध्यक्ष आहेत. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात शारीरिक चाचणी घेण्यात येईल. मुख्यतः चाचणीचा वेळ हा सकाळचा असून सकाळी ९ वाजता पर्यंत शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर उन्हाची दाहकता पाहून साधारण ५ वाजता उर्वरित उमेदवारांची चाचणी घेण्यात येईल. वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू भरती वेळेस तैनात राहणार आहेत, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.