अकोला दिव्य ऑनलाईन : अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आणि कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे सदस्यत्व कायम ठेवून, वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत झालेल्या वार्ताहर बैठकीत केली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या वर्किंग कमेटीच्या बैठकीत सर्वांसोबत चर्चा करून, एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे खरगे यांनी सांगितले. भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोन जागांवर विजय झालेल्या उमेदवाराला १४ दिवसात कुठल्याही एका जागेचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. दिलेल्या अवधीत जर सदस्यत्व रद्द केले नाही तर, दोन्ही जागांचे सदस्यत्व रद्द होते. या नियमानुसार आज राहुल गांधी यांनी गांधी कुटुंबाची परंपरागत असलेली रायबरेलीची जागा ठेवून, वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा उद्या राजीनामा देणार आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मागणी लावून धरली होती.
अखेर प्रियांका गांधी यांनी होकार दिला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.तेव्हा रितसर उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रियांका गांधी निवडणूक लढविणार असल्याचे खरगे यांनी सांगितले. वार्ताहर बैठकीत खरगे यांच्यासह राहुल गांधी, के.सी.वेणुगोपाल आणि प्रियांका गांधी उपस्थित होते.