Sunday, September 8, 2024
Homeसांस्कृतिक‘श्रीं’च्या जयघोषाने राजेश्वर नगरी दुमदुमली ! पूजाअर्चा करून जल्लोषात स्वागत

‘श्रीं’च्या जयघोषाने राजेश्वर नगरी दुमदुमली ! पूजाअर्चा करून जल्लोषात स्वागत

अकोला दिव्य ऑनलाईन : राज राजेश्वर नगरीत अविरत ५५ वर्षांची परंपरा जपत, टाळ-मृदुंगाच्या निनादात ‘अनंत कोटी… ब्रह्मांड नायक… महाराजाधिराज… योगीराज… भक्त प्रतिपालक… शेगाव निवासी… समर्थ सदगुरू श्री संत गजानन महाराज की जय.. च्या गजरात पंढरीनाथाच्या भेटीसाठी प्रस्थान झालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज शनिवारी भाविकांच्या अलाेट गर्दीने फुलांचा वर्षाव करत ‘श्रीं’च्या पालखीचे भक्तीभावाने पूजाअर्चा करून जल्लोषात स्वागत केले.

दरवर्षी प्रमाणे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास डाबकी रोडमार्गे हातात भगवे ध्वज, सोबत अश्व अन् टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘शेगावीचा राणा गजानन’ चा ‘जयघाेष करत संत गजानन महाराज यांच्या पालखीसह वारकऱ्यांचे आगमन झाले. पहाटेपासूनच ‘श्रीं’च्या दर्शनासाठी डाबकी रोड परिसरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती. ‘श्रीं’च्या आगमनासाठी पालखी मार्गाची स्वच्छता करून भाविकांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. चौकाचौकात ‘श्रीं’च्या प्रतिमेचे पूजन आणि भक्ती गीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता.पालखीवर फुलांचा वर्षाव करत भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. नेहमी प्रमाणे डाबकीराेडवरील खंडेलवाल भवन येथे वारकऱ्यांनी दुपारी भोजन घेतले.

श्री गजानन महाराज संस्था प्रमुखांनी ठरवून दिल्या प्रमाणेच वारकऱ्यांनी दुपारचं भोजन घेतल्यानंतर श्रींची पालखी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय गोडबोले प्लॉट जुने शहर येथून निघून, डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, विठ्ठल रुक्माई मंदिर, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, चिव चिव बाजार येथून मार्गस्थ होत, भाविक भक्तांनी स्वागत, सत्काराचा स्विकारत पालखी सायंकाळी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयात पोहचली. याठिकाणी भाविकांच्या गर्दीने जत्रेचे स्वरूप आले होते. वारकऱ्यांसाठी भोजन व भक्तांसाठी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्रींच्या दर्शनासाठी रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांची रीघ लागली होती.

पालखीचा रात्रीला येथे मुक्काम असून उद्या रविवार १६ जून २०२४ रोजी सकाळी ६ वाजता पालखी पुढील प्रवासासाठी प्रस्थान करून, जिल्हाधिकारी निवासमोरून, वन विभाग कार्यालय, खंडेलवाल भवन मार्गे गोरक्षण रोड, आदर्श कॉलनी शाळा क्रमांक १६ येथे दुपारी विश्रांती व महाप्रसादाचे वितरणानंतर संभाजीनगर, सिंधी कॅम्प मेन रोड,कारागृह समोरून, मेन हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, खोलेश्वर मार्गे सिटी कोतवाली चौक, राजराजेश्वर मंदिर समोरून, हरिहर पेठमधील श्री शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाऊन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!