गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : राममंदिर उभारणीनंतर अवघ्या काही महिन्यांनी पार पडलेल्या १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीत रामजन्मभूमी अर्थात अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत होणे, ही बाब बरेच काही दर्शवून गेली आहे. प्रभु श्रीराम यांचं जन्मस्थान आणि भारत देशाच्या राजसत्तेचा मार्ग म्हणजे उत्तर प्रदेश ! धार्मिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वपुर्ण असलेल्या उत्तर प्रदेशाने २०१४ मध्ये मान-सन्मानासह नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय पातळीवर भक्कम स्थान दिले. पण त्याच राज्याने यंदा २०२४ मध्ये, कधीही विसरू शकणार नाही. असा मोठा झटका नरेंद्र मोदी यांना दिला आहे. उत्तर प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर दलित व गरीब मतदारांनी समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस पक्ष यांच्या ‘इंडिया’ आघाडीला समर्थन देत, देशातील राजकीय क्षितीजावरील दृश्य पार बदलून टाकले. भाजपच पक्षीय बलाबल ६४ वरुन चक्क ३३ वर नेऊन नरेंद्र मोदी आणि भाजपला आपल्या राजकारणाची दिशा बदलण्यास विवश केले आहे. हे का?
उत्तर प्रदेश आजही देशाच्या राजकारणात सगळ्यात शक्तीशाली राज्य असून २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने ‘सामाजिक-समानता’ हे जाळं विणत या राज्यात निवडणूक जिंकली.पण यावेळी मतदारांनी या जाळ्याची वीण उसळली. तेव्हा हिंदू ओळख हा मुद्दा प्रासंगिक तर आहे. परंतु यामुळे मत मिळणार, ही ग्यारंटी नाही. मोदी आणि भाजपचा सामना आता एक मजबूत समाजवादी पक्ष आणि अधिक मजबूत राहुल गांधी यांच्याशी करावा लागेल, असाच स्पष्ट संदेश मतदारांनी दिला आहे. हे कशा साठी ?
देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशच महत्व अधोरेखित असताना, देशभरात पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखले जाते. पुरोगामी व हिंदुत्व अशा जोडीने चालणा-या महाराष्ट्राने पहिल्यांदा शिवसेना-भाजप युती सरकार जन्माला घातले. त्यांनतर लोकसभेच्या सत्तेसाठी भरभरून मतांचं दान देताना २०१९ मध्ये भाजपला ४८ पैकी २३ जागा दिल्या. पण यंदा १० च्या आत ठेवून भाजपला जबरदस्त चपराक दिली. तब्बल २७ सभा आणि २ रोड शो करुनही, स्वबळावर तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापनेसाठीचे सामर्थ्य हिसकावून घेण्यास महाराष्ट्रातील मतदारांनी सिंहांचा वाटा उचलला. कारण निकोप व एकोपाच्या राजकारणाच्या परंपरेला दिलेले बाजारु स्वरूप महाराष्ट्राच्या जडणघडणीत कधींही मान्य नाही, कोणा साठी ?
‘एक अकेला सब पर भारी’ चा गर्व आणि ‘राजा बोले प्रजा डोले’ चा अभिमान बाळगत ‘अब की बार ४०० पार’ चा नारा देत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांची बरोबरी करण्यासाठीचा मनसुबा ठेवून सुरू केलेल्या वाटचालीत शेवटी मतदारांनी हातात स्वबळावरचही मताधिक्य दूर ठेवले. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरयाणा, कर्नाटक, पंजाब या राज्यांमध्ये इंडिया आघाडीने अनेक धक्कादायक विजय नोंदवले. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. महाराष्ट्रातील शरदचंद्र पवार, उध्दव ठाकरे व कॉंग्रेसने पुरती वाट लावली.पश्चिम बंगालमध्ये तर ममता बॅनर्जी यांनी भाजपचा मस्ती जिरवली. विशेष म्हणजे खास तामिळनाडूतून आणलेला ‘संगोल’ नवीन संसद भवनात स्थापन करुनही तमिळनाडूत भाजपची पाटी कोरी ती कोरीच राहिली.
भाजप ३०० ते ३५० जागा जिंकून मित्रपक्षांसह ४०० जागा किंवा कदाचित त्याच्याही पुढे जाईल. अथवा भाजप सलग दुसऱ्यांदा ३०० जागांच्या पल्याड मजल मारेल, या समजुतीमध्ये राहिलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांचा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा विलक्षण अपेक्षाभंग झाला. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात भाजपने बहुतेक जागा राखल्या. तर ओडिशामध्ये लक्षणीय यश मिळवले. आंध्रातही चंद्राबाबू नायडू यांच्याशी आघाडीचा त्यांना फायदा झाला. केरळमध्ये भाजपने खाते उघडले, पण ‘तिसरी बार मोदी सरकार’ हे स्वप्न धुळीस मिळाले. पण २९३ एवढ्या जागांनी पुर्ण बहुमताने रालोआच पुढील सरकार स्थापणार हे निश्चित, परंतु यानिमित्ताने पुन्हा एकदा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आघाडी सरकार येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ असून मोदी आणि शाह यांचं यंदा हे अवघड जागेवरच दुखणं झाले आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दहा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत किंवा त्याआधी १३ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत कधीही आघाडी सरकारच्या माध्यमातून कारभार केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सर्वस्वी नवीन प्रयोग असून आता अशी वेळ आली की, रालोआ आघाडीतील इतरही नेत्यांशी प्रामुख्याने नीतिशकुमार आणि चंद्राबाबू नायडू या सारख्या नेत्यांशी जुळवून घेण्यासाठी, मोदींना स्वतःचा अवतार बदलाव लागेल. आता मोदी आणि भाजपला सरकारजुळणीपासून चर्चा करावी लागेल. ‘अबकी बार’ या भाजपच्या आवडत्या ललकारात आता निव्वळ मोदींऐवजी ‘आघाडी सरकार’ या शब्दांचा अनपेक्षित शिरकाव झाला आहे.