अकोला दिव्य न्युज ब्युरो : अमाप संपत्ती आणि खुली सुटीमुळे हाताबाहेर गेलेल्या लाडक्या दिवट्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना, आज अख्ख अग्रवाल कुटुंब तुरुंगात पोहोचले आहे. पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पोर्श कार पुण्यातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. यानंतर या मुलाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र १५ तासांत जामीन मिळाला. तेव्हा समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. त्यापाठोपाठ आता आज या मुलाच्या आई शिवानी अग्रवालला अटक करण्यात आली आहे.
काय चौकशी केली जाण्याची शक्यता?
अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची बातमी समोर आली. त्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं ते त्याची आई शिवानी अग्रवाल यांचं होतं का? त्यांनी कुणाला फोन करुन मुलाला वाचवण्यासाठी मदत मागितली, अपघाताचा कलंक कुणाला डोक्यावर घेण्यास सांगितलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस त्यांना चौकशीदरम्यान विचारु शकतात. रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर शिवानी अग्रवाल बेपत्ता झाल्या होत्या. मात्र पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. अपघातानंतर तीन दिवसांनी रॅप साँग गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ सदर अल्पवयीन मुलाचा आहे हे समजून त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवानी अग्रवाल कॅमेरासमोर आल्या आणि ढसाढसा रडत रॅप साँगमधला तो मुलगा माझा नाही असं सांगितलं होतं. त्यावेळीही त्या चर्चेत आल्या होत्या.