अकोला दिव्य न्युज ब्युरो : नॅशनल असिसमेंन्ट अक्रिडीऐशन कॉन्सील (नॅक) मुल्यांकन समितीकडून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अण्ड सोशल वर्क महाविद्यालयास AGPA २.६२ सह B + दर्जा जाहीर केला असून पुढील ५ वर्षाकरीता हा दर्जा कायम असणार आहे. अव्यवसायीक अभ्यासक्रमातील कायमविना अनुदानीत असलेले आणि नॅककडून बी+ ग्रेड प्राप्त करणारे अमरावती विद्यापीठातील हे एकमेव कॉलेज आहे. अकोला येथील प्रबोधन नगर येथे कार्यरत आणि २००६ मध्ये कायम विनाअनुदानीत तत्वावर स्थापन झालेल्या या महाविद्यालयात सोशल वर्क, जर्नालिझम व मासकम्युनिकेशन युजी व पीजी डिग्री कोर्सेसला विद्यापीठाची मान्यता आहे.
या वर्षीपासुन महाविद्यालयास ११ महाराष्ट्र बटालियन कर्नल चंद्रप्रकाश बडोला यांनी ५० विद्यार्थी क्षमता एन.सी.सी युनिटला मान्यता दिली आहे. महाविद्यालयातील अद्यावत सर्व सुविधा युक्त ग्रंथालयाची नॅक समिती व विद्यापीठ समितीने विशेष नोंद घेतली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानच्या ४ मजली इमारतीत युजिसीच्या निर्देशानुसार आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध बघून अमरावती विद्यापीठाने महाविद्यालयास विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढवुन दिली आहे. ज्यामध्ये बीएसडब्ल्यू करीता १२०, बीजेएमसीला ८० आणि एमजेएमसीला ८० विद्यार्थी क्षमतेचा समावेश आहे. अकोला कॉलेज ऑफ जर्नालिझम, अकोला या पुर्वीच्या नावात दुरुस्ती करून सुधारीत डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अण्ड सोशलवर्क अकोला या नावाला विद्यापीठाने मान्यता दिली आहे.
प्रवेशित विद्यार्थ्यांना नोकरीची हमी, लर्न अण्ड अर्न, कोणत्याही प्रकारचे डोनेशन न घेता गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश अश्या योजना विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी ठरल्यामुळे विद्यार्थांचा कल महाविद्यालयाकडे वाढला आहे.
उत्तम ग्रेड प्राप्त केल्याबाबत विद्यापीठ, नामांकित संस्था, सामाजीक कार्यकर्ता, शैक्षणीक क्षेत्रातील मान्यवरांनी महाविद्यालय प्रशासन व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे. व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा मुकुंद भारसाकळे, उपाध्यक्ष अशोक इंगळे, कोषाध्यक्ष रमेश तायडे, सचिव तथा प्राचार्य प्रा.डॉ.गणेश बोरकर, संचालक पी टी इंगळे, प्रा अंबादास नंदागवळी तसेच समस्त संचालक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.