अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला जिल्ह्यात तापमानामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र जमावबंदी असतानाही शेतकऱ्यांच्या कपाशीच्या बियाण्यांसाठी रांगा वाढल्या आहेत. बियाणेच मिळत नसतील तर पेरणी कशी करणार? अधिक उत्पादन मिळवून देणाऱ्या बियाण्यांसाठी आग्रह धरणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक बियाणे उपलब्ध करून देत अकोल्यातील रांगा संपवा, असा इशारा शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी अकोल्याचे जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे यांना दिला आहे. पवळ यांनी कृषी अधिकारी किरवे यांची भेट घेऊन बियाणे टंचाईवर चर्चा केली. एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन निवेदनही सादर केले. यावेळी शिवसेनेचे अकोला निवासी उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले उपस्थित होते.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यात कापसाचे उत्पादन होते. मागील वर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यंदा मान्सून दमदार बरसणार असल्याचा अंदाज आहे. पाऊस मुबलक असल्याने मागील वर्षीची कसर भरून काढण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. कृषी विभागानेही बियाण्यांचे नियोजन केल्याचे कागदोपत्री दाखविले जात आहे. वास्तवात वीस एकराच्या शेतकऱ्याला केवळ दोन पाकिट बियाणे कृषी केंद्रांमधून विक्री केले जात आहेत. या दोन पाकिटांमध्ये पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला असल्याकडे पवळ यांनी किरवे यांचे लक्ष वेधले.
बियाण्यांची वाढती टंचाई संपूर्ण विदर्भात आज शेतकऱ्यांपुढील गंभीर प्रश्न बनला आहे. बियाणे मिळविण्यासाठी कृषी केंद्रांपुढे रांगा वाढू लागल्या आहेत. प्रत्येकाला दोन पाकिट मिळावे या हेतूने शेतकऱ्यांच्या घरातील महिलाही कृषी केंद्रांपुढे रांगेत लागत आहेत. यातूनच सहा दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये रांगेत लागलेल्या महिलांमध्ये हाणामारीची घटना घडली. शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी काही दुकानदारांकडून प्रत्येक पाकिटांमागे ३००-४०० रुपये अधिकचे घेतले जात असल्याच्याही तक्रारी शिवेसेनेचे राज्य समन्वयक म्हणून वऱ्हाडातील अनेक शेतकऱ्यांनी केल्याचा मुद्दाही पवळ यांनी मांडला. कृषी विभागाने काटेकोर नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटून प्रश्न मांडणार
बियाणे टंचाई आणि त्यासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या रांगा हा विषय गंभीर आहे. शिवसेना कायम शेतकरी हितासाठी लढणार पक्ष आहे. शेतकऱ्यांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, त्यांची अडवणूक होणार नाही यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची धडपड सुरू असते. बियाण्यांसाठीच्या या रांगा संपविण्यासाठीही त्यांना साद घालणार आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची माहिती देणार, असेही रामेश्वर पवळ यांनी सांगितले.