Wednesday, November 20, 2024
Homeराजकारणशरद पवारांच्या ‘लेडी जेम्स बाँड’चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?

शरद पवारांच्या ‘लेडी जेम्स बाँड’चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारा यांच्या अत्यंत विश्वासू व लेडी जेम्स बाँड ही ओळख असलेल्या महिलेने अजित पवार गटात जाण्याचं निश्तिच केलं आहे. अशी चर्चा एका घडामोडीमुळे सुरु झाली आहे. या महिला दुसऱ्या तिसऱ्या कुणीही नसून सोनिया दुहान आहेत. राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी शरद पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर जेव्हा तो मागे घेतला तेव्हा त्या शरद पवारांच्या मागच्या खुर्चीत बसल्या होत्या. त्यांच्या तिथे असण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं तसंच पहाटेचा शपथविधी झाला तेव्हाही त्यांचं नाव चर्चेत होतं.

शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आणि लेडी जेम्स बाँड समजल्या जाणाऱ्या सोनिया दुहान आता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. कारण सोनिया दुहान या अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीला मागच्या दाराने पोहचल्या आहेत. धीरज शर्मा आणि सोनिया दुहान असे दोघेही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. एबीपी माझाने वृत्त दिलं आहे. जर असं घडलं तर शरद पवारांसाठी हा धक्का असणार आहे.

कोण आहेत सोनिया दुहान?

सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत. शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्यासंदर्भात मे २०२३ मध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान या शरद पवारांच्या मागेच बसल्या होत्या. सोनिया दुहान या हरियाणामधल्या हिसारच्या रहिवासी आहेत. त्यांच्या तीन भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत. हिसारमध्ये सोनिया दुहान यांनी शालेय शिक्षण घेतलं आहे. यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून Bsc. केलं आहे. त्यानंतर त्या अंबाला या ठिकाणी आल्या. वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या. आता याच सोनिया दुहान अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे.

सोनिया दुहान यांना लेडी जेम्स बाँड का म्हटलं जातं?

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. या शपथविधीला पहाटेचा शपथविधी असं म्हटलं जातं. हा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गायब झाले होते. ज्यामध्ये दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील यांचा समावेश होता. भाजपाच्या गळाला लागलेल्या या सगळ्या आमदारांना परत आणण्याचं काम सोनिया दुहान यांनी केलं असं सांगितलं जातं. गुरुग्राम या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमधून सोनिया दुहान यांनी या सगळ्यांना परत आणलं. शरद पवार यांना २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी एका आमदाराचा मेसेज आला. आम्हाला दिल्लीतल्या कुठल्यातरी हॉटेलमध्ये कोंडल्याचा उल्लेख त्यात होता. त्यावेळी सोनिया दुहान आणि त्यांचा सहकारी धीरज शर्मा यांनी या आमदारांचं लोकेशन शोधलं. गुरुग्रामच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये हे चार आमदार असल्याचं त्यांना कळलं. त्या हॉटेलमध्ये सोनिया दुहान आणि धीरज शर्मा गेले. तिथे भाजपाचे १०० ते १५० कार्यकर्ते होते. हे सगळेजण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर सोनिया आणि धीरज यांनी हॉटेलच्या मागच्या दाराने जिथे कुठेच सीसीटीव्ही वगैरे नव्हते तिथून या आमदारांना खुबीने बाहेर काढलं. या आमदारांना शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आणलं होतं. त्यानंतर त्यांना लेडी जेम्स बाँड म्हटलं जाऊ लागलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!