अकोला दिव्य न्युज ब्युरो : सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यांमध्ये तापमान 44 ते 46 अंश सेल्सिअस असुन तापमानाचा पारा चढता असताना, शहरातील काही खासगी शाळेच्या संचालकांनी येत्या 5 जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबतची लेखी सुचनाही पालकांना पाठविण्यात आल्याने पालकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.तर संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व व्यवस्थापन आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचे पालक सांगत आहेत. वाढत्या तापमानामुळे आधिच चिंतेत असलेल्या पालकांच्या चिंतेत शाळा व्यवस्थापनाच्या अनाकलनीय भुमिकेने भर घातली आहे.
विशेष म्हणजे जुन महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सूट्टी नंतर तेथील शाळा सुरू केल्या जाणार आहेत. असे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले असताना आणि सध्या उष्णतेची लाट असताना, या शाळा संचालकांनी घेतलेल्या निर्णयाने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.उष्णतेची लाट 31 में 2024 पर्यंत राहण्याची शक्यता असून, यानंतर तातडीने तापमान सर्वसामान्य होणार काय? हे सध्यस्थितीत माहिती नसताना, ही दंडेलशाही का ? विद्यार्थ्यांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोणाची? अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांच्या सुट्टयांच्या नियोजनाची घोषणा करताना राज्यातील आगामी शैक्षणिक वर्ष 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरु होणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करण्याबाबतच्या सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. यामध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार 15 जून रोजी सुरु करण्यात याव्यात. तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सूट्टी नंतर तेथील शाळा 1 जुलैपासून सुरू करण्यात याव्यात असे आदेशीत केले आहे.
तेव्हा अकोला शहरातील खासगी शाळा अर्थात कॉन्व्हेंटना हा आदेश लागू नाही का? सध्या देशभरात तापमानाचा पारा चढत असून, सर्वजण अक्षरशः होरपळून निघत असून, आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.अशा विपरीत काळात ५ जुनला शाळा सुरू होत असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची सुचना पालकांना दिली गेली आहे. ही दंडेलशाही असून मख्ख असलेला अकोला येथील शिक्षण विभाग याबाबत दखल घेण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे अकोला जिल्हाधिकारी कुंभार यांनी तातडीने लक्ष घालून सुचना द्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.