अकोला दिव्य न्युज ब्युरो : विनयभंग व इतर गंभीर आरोपाखाली नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार खदान पोलीस स्टेशनचे निलंबित ठाणेदार धनंजय सायरेने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावत जामीन नाकारला आहे. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी कालच निलंबित करून त्याच्या विभागीय चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनला कार्यरत असताना पोलीस निरीक्षक धनंजय सायरे विरूध्द नागपूर मधील नंदनवन पोलीस स्टेशनला अमरावती जिल्ह्यातील एका युवतीने अत्यंत गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केल्यापासून राज्याच्या पोलिस दलात खळबळ उडाल्याने राज्यभरात अकोला पोलीस दलाची पुन्हा बदनामी झाली. जिल्ह्यातील पोलीस दलात कार्यरत प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची मान या घटनेमुळे शरमेने खाली झुकली.
निलंबित पोलिस निरीक्षक धनंजय सायरेने गेल्या आठवड्यातील शनिवार पासून चार दिवसांची रजा टाकून नागपुरात येवून "नको ते धंदे" केल्याने गंभीर गुन्हा दाखल झाल्यावर अकोल्याला खदान पोलीस स्टेशनला कर्तव्यावर हजर न होता नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी त्याने कालच अर्ज दाखल केला होता.त्यावर न्यायालयाने नागपूर पोलिसांना से मागितला होता, त्यानुसार पोलिसांनी आपला "से" दाखल केला असून आज बुधवार दि.२२ मे २०२४ रोजी धनंजय सायरेच्या जामीन अर्जावर सुनावणी होवून न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य व एफआयआरमध्ये नमूद बाबींचा व आरोपीचे "सामाजिक स्थान" पाहता कठोर भूमिका घेत त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.आरोपीला जामीन मिळू नये यासाठी सरकार पक्षाची बाजू मांडत असताना सरकारी वकील व तपास अधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रयत्न केले. सर्व परिस्थिती पाहता निलंबित पोलीस निरीक्षक धनंजय सायरे ह्याला नागपूर पोलिसांसमोर "सरेंडर" झाल्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही.