गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : संपत्ती,सत्ता कमविण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. तो कसं कमवायचे हवा, हा अधिकार देखील आहे.पण याच सत्ता, संपत्तीचा माज चढला की, इतरांच्या जीवनाचं मौल कवडीमोल ठरवले जाते. पण हा माज नकळतपणे कधीतरी मस्तीखोराला कवेत घेऊन कुटुंबाचा नाश करतो, हे त्रिकालाबाधित सत्य तीन दिवसापुर्वी पोर्शकार अपघातातून अधिक ठळकपणे समोर आले आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. दोन निष्पाप निरागस जीवांचा बेदरकार वृत्तीने बळी घेणारा आरोपी अल्पवयीन असताना, या दुर्घटनेसाठी मुलापेक्षा त्याचे वडिल-कुटुंब जास्त जबाबदार आहेत.आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबावरुन हे स्पष्ट होते. तर ताब्यात असलेल्या या आरोपीची पोलिसांनी केलेली बडदास्त अस्वस्थता निर्माण करणारी असून, पोलिसांची आधीच डागाळलेली प्रतिमा अधिक गडद झाली आहे. तशीही पोलिसांची प्रतिमा यापेक्षा वेगळी नाहीच.जनभावना अनावर होत असल्याने पोलिसांनी आपली भुमिका बदलली, इतर चार जणांवर गुन्हा दाखल केला.पण हे अगोदरच का झाले नाही? याच घटनेत न्यायालयाने दिलेला जामीन व आरोपीला केलेले दिशानिर्देश हास्यास्पदच म्हणावा लागेल.या निर्णयाला सत्तेचे पाठबळ तर नाही ना? अशी पुण्यात चर्चा केली जात असून हे असेच सुरू राहिले तर..?
दोन तरुणांचा बळी घेणारा अल्पवयीन मुलगा हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर्स विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे आणि मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करताे हे वडिलांना माहिती आहे, अस चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले.अशी माहिती पोलिसांनीच दिली. तेव्हा मुलाने दिलेल्या या माहितीवरून वेगळे काही सांगण्याची गरज नाही.
आता या प्रकरणी ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला बार, पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हाॅटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हाॅटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पण कठोर शिक्षा होईल का? अल्पवयीन मुलाने चालविलेली कार विनाक्रमांक व विनारजिस्ट्रेशन हाेती. अपघातग्रस्त कार मुंबई डीलरने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच दिली आहे. सर्वसामान्य व्यक्तीला साधी दुचाकी मिळत नाही, येथे तर लाखो रुपये किंमतीची कार कशी दिली गेली. अर्थात विशाल अग्रवाल यांच्या रुतब्या शिवाय शक्य नाही. मग कायदा सर्वांसाठी आहे का? आरोपी अल्पवयीनच असून, जन्माचा पुरावा मिळाला आहे. मुलाला न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात अपील करणार आहोत.असे पोलिस म्हणू लागले आहेत. तेव्हा भादविच्या कोणकोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल केला, हे पोलिसांनी सांगितले पाहिजे.
न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी
अपघातानंतर अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला. मुलाला न्यायालयाने १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले. तसेच, ‘अपघात’ या विषयावर निबंध लिहिण्याची अट घातली. तसेच येरवडा वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियमन करणार आहे. दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या करोडपतीच्या मुलाला निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांसोबत काम करणे अशा शिक्षा असतात का, असा सवाल शहरवासीयांनी व्यक्त केला आहे.
आरोपीला व्हीआयपी वागणूक
अल्पवयीन मुलाला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याला व्हीआयपी वागणूक दिल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. पिझ्झा बर्गरही बाहेरून आणून दिल्याचे ते म्हणाले. अपघाताबाबत अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या. कँडल मार्च काढले गेले. मात्र, मृतांच्या नातेवाइकांना भेटण्याची तसदी कुठल्याही नेत्याने, नागरिकाने घेतली नाही, असा खेदही व्यक्त केला. अश्विनी, अनिस यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.