अकोला दिव्य न्युज ब्युरो : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (सीआयएससीई) एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) या शिक्षण मंडळांच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार २१ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा
https://education.indianexpress.com/embed/board-exams?board-slug=cbse-board-result
यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बारावीचा निकाल यंदा वाढला आहे. त्यामुळे राज्य मंडळाचा निकाल वाढणार की कमी होणार याबाबत उत्सुकता आहे.
गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता.राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकाल मंगळवारी जाहीर होणार असल्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच निकालाची प्रिंट घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.
ऑनलाइन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी २२ मे ते ५ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल.
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी आधा उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५) श्रेणीसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना २७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.