अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी यांना शिवीगाळ करून ॲड. प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसचे साजिद खान पठाण यांच्यावर अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर डाबकी रोड पोलीस ठाण्यात साजिद खान पठाण यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे महानगर महासचिव गजानन गवई यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, साजिद खान पठाण यांनी १० मे रोजी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी हाफिज नजीर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. ॲड. प्रकाश आंबेडकरांना मतदान करण्याचे आवाहन का केले? या कारणावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सोबतच ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलून मौलवी यांना भ्रमणध्वनीवरून धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. साजिद खान यांच्या संभाषणाची ध्वनिफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली.
साजिद खान पठाण यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या अगोदर देखील त्यांनी मौलवींची बदनामी केल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन साजिद खान पठाण यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. या संदर्भातील तक्रार वंचित आघाडीने शहर कोतवाली, जुने शहर, डाबकी रोड, अकोट फैल पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. गजानन गवई यांच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांच्यावर भादंवि कलम १५३ अ, १२० ब, २९५ अ व ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.