अकोला दिव्य न्युज ब्युरो : मध्य प्रदेश येथील कटनी येथील प्रख्यात अनिल इंडस्ट्रीज या उद्योग समुहाच्या अकोला औद्योगिक वसाहतीमधिल डाळ मिलवर जबलपूर येथील आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने आज गुरुवारी छापा टाकून कारवाई सुरू केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या कारवाईमुळे उद्योजक आणि व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नागपूर आयकर विभागाकडून काल छापा टाकण्यात आलेल्या भारती सुपारीचे विक्रेता व डाळ मिल उद्योजक रोहडा यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या मिलमध्ये अनिल इंडस्ट्रीजकडून मिडास ब्रॅण्ड या नावाने डाळीचे उत्पादन केले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज गुरुवार 15 मे रोजी सकाळी कटनी जिल्ह्यातील माधवनगर येथील अनिल इंडस्ट्रीजच्या संचालकांच्या निवासस्थानासह 4 व्यावसायीक प्रतिष्ठानवर देखील छापे टाकून कारवाई केली जात आहे.
भारती सुपारीचे विक्रेता रोहडा यांच्याकडे काल छापा घातल्यानंतर आज अनिल इंडस्ट्रीजवरच्या कटनी माधवनगर व अकोला येथे कारवाई झाल्याने या कारवाईचे धागेदोरे अजून कोणासोबत जुळून आहेत.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
मध्य प्रदेशात अनिल इंडस्ट्रीजही अल्पावधीत व्यवसाय क्षेत्रात ख्यातनाम झाली असून, जवळपास 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने कटनी येथे छापा टाकला असताना, अकोला औद्योगिक वसाहतीमधिल रोहडा यांच्या मालकीच्या परंतु अनिल इंडस्ट्रीजच्या संचालकांकडून संचालित होत असलेल्या डाळ मिलवर जबलपूर येथील आयकर विभागाने छापा टाकला आहे. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती.