अकोला दिव्य न्युज ब्युरो : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा बहुप्रतीक्षित निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने काल घोषित केला असून, केशव प्रफुल्ल कोठारी याने ९७.६० टक्के गुण मिळवून शाळेतील पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकाविले आहे.
केशव कोठारी हा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात ख्यातनाम प्रभात किडस स्कूलचा विद्यार्थी आहे. केशव कोठारीला इंग्रजी या विषयात ९२ तसेच संस्कृतमध्ये १०० पैकी १०० तर गणितात ९५, सायन्समध्ये ९९ आणि सोशल सायन्स ९७ आणि माहिती तंत्रज्ञान विषयात ९७ गुण मिळाले आहेत.केशवच्या गुणांची सरासरी टक्केवारी ९७.६० टक्के असून शाळेच्या गुणवत्ता यादीत त्याने १० वे स्थान पटकाविले आहे.
अकोला शहरातील औषधीचे थोक विक्रेता उमेशचंद्र कोठारी यांचा केशव हा नातू आणि प्रफुल्ल कोठारी यांचा मुलगा आहे. लहानपणापासून तल्लख स्मरणशक्ती आणि नियमितपणे अभ्यास करण्याचा सराव असल्याने केशव सहजपणे उत्तीर्ण झाला.आजी शोभा कोठारी यांचं प्रोत्साहन आणि आई पुनम कोठारीकडून दररोज लक्ष घालून अभ्यास करून घेतल्यामुळे आपण हे यश मिळवले आहे, या सोबतच प्रभातचे संचालक डॉ.गजानन नारे, संचालिका सौ.वंदना नारे, प्राचार्या वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे आणि विषय शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.असं केशवने सांगितले.
आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे, अशा मानस केशवने व्यक्त केला. यासाठी ‘नीट’ परिक्षेतही गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करण्यासाठी आतापासूनच मानसिक तयारी केली आहे. केशव प्रफुल्ल कोठारीने प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.