Thursday, December 26, 2024
Homeसामाजिकसिएटलवासीयांना अदिती राजपूतने कृतीतून दिला "अवघे विश्वची माझे घर" चा प्रत्यय

सिएटलवासीयांना अदिती राजपूतने कृतीतून दिला “अवघे विश्वची माझे घर” चा प्रत्यय

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सकाळी दहा, साडेदहाच्या सुमारास अमेरिकेतील सिएटल शहरातील एका नामांकित कंपनीत लीड प्रोजेक्ट मॅनेजर असलेली एक भारतीय युवती संपूर्ण एकाग्रतेने आपलं काम करत असताना, सहजपणे तिची नजर समोरच्या रस्त्यावर गेली.अन् आपलं काम सोडून आपल्या एका सहकाऱ्याला सोबतीला घेऊन धावत सुटली. चक्क रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला उभे राहून येत असलेले पादचारी आणि सर्व वाहनांना थांबवून U टर्न घेऊन परत पाठवणे सुरू केले.

दरम्यान 911 या नंबरवर कॉल पोलिसांना माहिती दिली.अवघ्या काही मिनिटात पोलीस आणि फायर ब्रिगेडचे लोकं तेथे आले आणि त्या युवतीने सुटकेचा निःश्वास सोडला.जर या युवतीने खबरदारीची उपाययोजना केली नसती, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना, वाहनांना परत पाठवलं नसते तर,..तर अनर्थ झाल्याशिवाय राहिला नसता. कदाचित मनुष्यहानी सुद्धा झाली असती. मात्र सामाजिक कर्तव्याचे भान आणि संकटांची चाहूल ऐकण्याची क्षमता असल्याने या भारतीय युवतीने आपल्या कृतीतून महाराष्ट्रातील संतांची “अवघे विश्वची माझे घर” ही शिकवण कृतीतून दाखवून दिले. हा सर्व वृत्तांत दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील सिएटल शहरात घडलेल्या घटनेचा आहे.

अमेरिकेतील सिएटल येथील एका नामांकित कंपनीत अदिती राजपूत ही लीड प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर कार्यरत असून, नेहमी प्रमाणे सकाळी कार्यालयात आपल्या कामात व्यस्त होती. सहजपणे तीची नजर समोर रस्त्यावर गेली. तेथे मोठ्या संख्येने ट्रक, डांबर व प्रॉपिलिन गॅसचे टँकर उभे होते. अचानक तिला रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या एका डांबराच्या ट्रकला आग लागलेली दिसली. लवकरच ही आग रौद्ररूप धारण करणार आणि मोठे स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, हे तिच्या लक्षात येताच, क्षणही न दडवता आपल्या एका सहकाऱ्याला सोबतीला घेऊन धावत त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे राहून रहदारीला नियंत्रित करुन वळते करु लागली.

अवघ्या पाच सात मिनिटात शंभर दीडशे लोक आणि वाहनांना धाडसाने थांबवून, परतवून लावलं तरआग धगधगत होती. थोड्याच वेळात आगीच्या ठिकाणी तीन ब्लास्ट झाले, प्रचंड आवाजाने सगळं परिसर हादरलं ! काही मिनिटात पोलीस पोहचले, फायर ब्रिगेडच्या लोकांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. पण सर्व सोपस्कार पूर्ण होण्यापूर्वीच संभाव्य अपघातापासून शेकडो लोकांना सावध केलं, तिच्या समयसूचकतेने शेकडो लोकं, अनेक गाड्या सुखरूप राहिले.

प्रसंगावधान राखून तत्परतेने तिने केलेल्या कार्याची उपस्थितांसह कार्यालयातील सहकारी, अधिकाऱ्यांनी तिच्या समयसूचकतेची स्तुती करीत कौतुक केले. एका भारतीय मुलीच्या धाडस व तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असताना, आपल्या गावात, भागातही तिच्या या अविस्मरणीय कार्याची दखल घेणे अगत्याचे आहे. कारण ही युवती आमच्या अकोल्याची सुकन्या असून, अकोला शहरातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व असलेले प्रदिप राजपूत व मनिषा राजपूत यांची मुलगी ‘अदिती’ आहे. अदितीने दाखवलेल्या धाडसाचे व समयसूचकतेचे कौतुक होणे काळाची गरज असल्याने हा लिखाणाचा खटाटोप !

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!