अकोला दिव्य न्युज ब्यूरो : लोकसभा निवडणुकीत एकीकडे ग्यारंटी वर गारंटी दिली जात असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्यासाठी अद्याप सरकारचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत.आजच्या तारखेनुसार ज्वारीचा बाजारभाव किमान 1850 व कमाल 2370 रुपये आहे.ज्वारीचा हा बाजारभाव सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या वर्षीचा हमीभाव 2990 प्रति क्विंटल आहे. म्हणजे शेतकऱ्यांना सरासरी 880 रुपये प्रति क्विंटल नुकसान होत आहे. तेव्हा गारंटी देण्यापेक्षा तातडीने सरकारने ज्वारीची हमीभावात खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाने केली आहे.
शेतकरी जागर मंचाने आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संयोजक प्रशांत गावंडे यांनी याबाबतीत माहिती देताना सांगितले की, निवडणूकीच्या धुराड्यात शेतकऱ्यांचे जीवन-मरणाचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळालेले नाहीत. बाजारात सोयाबीन व कापसाला अतिशय कमी भाव असून आयातीमुळे हरभरा पोखरला जात आहे. उन्हाळी ज्वारीची हमी भावापेक्षा तब्बल 900 रुपये कमी भावात खरेदी केली जात आहे. सर्वच पक्ष प्रचारात असून सरकारी यंत्रणेला कोणतंही सोयरसुतक नाही. आजच्याघडीला ज्वारीची 2500 क्विंटल आवक झाली आहे. म्हणजे शेतकऱ्यांचे किमान 22.50 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. संपूर्ण प्रचारात शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर राज्यकर्ते बोलले नाही. प्रशासनाने काही हालचाल केल्याचे निदर्शनात आले नाही. व्यापारी मातीमोल भावाने शेतमालाची खरेदी करीत आहे. निवडणुकीत प्रचंड श खर्च करणारे उमेदवार, शेतकरी प्रश्नांवर मूग गिळून आहेत. मतदानानंतर गारंटीवाले बोलतील अशी अपेक्षा होती परंतु दोन्हीही श्रमपरिहारात मग्न असावेत.असा टोला गावंडे यांनी लगावला.
मागील काही वर्षात अकोला जिल्ह्यामध्ये रब्बी व उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला आहे. खरीप हंगामात सातत्याने शेतकऱ्यांच्या हातात फक्त उणेपट्टी येत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट किंवा पावसात अधिकचा खंड या संकटातून शेतकऱ्याची सुटका होताना दिसत नाही. या दृश्चक्रातून सूटकेसाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीचा आधार घेतलेला दिसतो. वर्ष 2023-24 या हंगामात अकोला जिल्ह्यात एकूण 14 हजार 500 एकरवर ज्वारीची लागवड झाली आहे. यामधून साधारण 20 हजार टन ज्वारीचे उत्पादन अपेक्षित आहे. आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील सर्व बाजार समितीत 2 हजार 518 टन ज्वारीची आवक झाली आहे. आजच्या तारखेनुसार शेतकऱ्यांना ज्वारीचा बाजार भाव 1850 ते. 2370 मिळत आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून लवकरात लवकर हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले नाही तर नुकसान प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा यावेळी शेतकरी जागर मंचाने दिला.
एकूण अपेक्षित उत्पादनाच्या फक्त 12 टक्के ज्वारी बाजारात आली आहे. उर्वरित 88 टक्के ज्वारी अजूनही शेतक-यांच्या घरातच आहे सरकारला खरचं शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर लवकरात लवकर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावी. जर ज्वारी खरेदी संदर्भात योग्य निर्णय झालाच नाही. तर उद्भवणाऱ्या परिस्थितीला फक्त आणि फक्त येथील प्रशासन व सरकार जबाबदार असणार आहे, असा निर्वाणीचा इशारा यावेळी शेतकरी जागर मंचाने दिला. वार्ताहर बैठकीला प्रशांत गावंडेसोबत रवि अरबड, गजानन हरणे, ज्ञानेश्वर सुलताने प्रशांत नागे उपस्थित होते.