अकोला दिव्य न्युज ब्युरो : दरवर्षी अकोला महानगरपालिकेतर्फे मालमत्ता करामध्ये सामान्य करात आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांसाठी दिल्या जाणार्या सुटपासून अकोलेकरांना वंचित ठेवले गेले. मनपा प्रशासनाकडून यासाठी आचारसंहितेचे कारण दिले जात होते. अकोला लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचे २६ एप्रिल रोजी मतदान पुर्ण होताच, आचारसंहिता शिथिल झाली. तेव्हा दरवर्षी प्रमाणे ही सुट देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक सुनील लहाने यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेत आयुक्तांनी १५ मे पासून मालमत्ता करात ७ टक्के सुट देण्याची तयारी सुरु केली आहे. प्रशासन लवकरच तसा आदेश काढणार आहे. अशी माहिती निलेश देव यांनी अकोला दिव्य सोबत बोलताना दिली. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा भेटणार आहे, असा दावा त्यांनी केला.
दरवर्षी प्रमाणे सामान्य अकोलेकरांना ७ टक्के ,६ टक्के व ५ टक्के सुट मालमत्ता करात नियमानुसार देण्यात यावी.ज्या अकोलेकरांनी ३० एप्रिलपूर्वी सन एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ चा मालमत्ता कर भरला असेल त्यांना सात टक्के रक्कमेची सुट देण्याची मागणी देव यांनी आयुक्तांकडे केली आहे. यापूर्वी दरवर्षी मालमत्ता करात आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यात वरील प्रमाणे सुट दिली जात होती. त्यामुळे मालमत्ता कराचा भरणा जास्तीत जास्त प्रमाण होऊन त्याचा लाभ मनपाला होत आला आहे.
यावर्षी मात्र एप्रिलमध्ये कराचा भरणा करणार्यांकडून पूर्ण रकमेची वसुली केली जात असल्याने मालमत्ताधारकांमध्ये नाराजी आहे. आचारसंहित असल्याने कोणत्याही प्रकारची सुट देता येत नाही, असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र मतदानानंतर आचारसंहिता शिथिल झाली असल्याने मालमत्ता करात सुट देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांनी केली. अकोला महापालिकेने उशिराने हा निर्णय लागु केला आहे. काही नागरिकांनी मालमत्ता कर भरला असुन त्यांना देखील सुटीचा फायदा देण्याची मागणी निलेश देव यांनी केली आहे.